चंद्रपूर : मूल तालुक्यातील सोमनाथ पर्यटन स्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या वसाहतीत वास्तव्याला असलेल्या अन्नपूर्णा बिलोने या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात महिलेता मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, वाघासोबत लढा देऊनही पत्नीची वाघाच्या जबड्यातून सुटका करण्यात पतीला यश आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीराम बिलोने आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा बिलोने (५२) हे बाबा आमटे प्रकल्पाच्या वसाहतीत वास्तव्याला आहेत. सोमवारी पहाटे ४.३० वाजता अन्नपूर्णा बिलोने अंगणात भांडी साफ करत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. पत्नीची आरडा ओरड ऐकून पती तुळशीराम झोपेतून जागा झाला. तोपर्यंत वाघाने पत्नीचा गळा पकडला होता. तुळशीराम घाबरला नाही आणि तिला वाचवण्यासाठी पत्नीचे पाय ओढू लागला. पण, वाघासमोर त्याची ताकद पुरेशी नव्हती. त्याने जवळच पडलेली काठी उचलली आणि वाघावर हल्ला केला. हल्ल्यामुळे वाघ तेथून पळून गेला. मात्र अन्नपूर्णा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मूल पोलिसांना तसेच वन विभागाला देण्यात आली. त्यावेळी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले मेजर राष्ट्रपाल काटकर, धनराज नेवारे, वेदनाथ करंबे इत्यादींनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
वन विभागाचे उच्च अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि मृताच्या पतीला २० हजार रुपयांची तात्काळ मदत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.