लोकसत्ता टीम

वर्धा : समाजसेवा म्हणजे एकप्रकारचे वेडच, असे म्हटल्या जाते. स्वतःच्या वेळेचा व पैश्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणाऱ्या व्यक्तीचा सर्वच सन्मान करतात. म्हणून असे सेवाव्रती आदरास पात्र ठरतात. या कथेत समाजसेवेचे व्रत घेतलेल्या एकाने चक्क भेट मिळालेली कार विकली आणि त्यातून रुग्णवाहीका खरेदी केली. हिंगणघाट येथील गजू कुबडे हा असाच समाजसेवी रुग्णमित्र.

एखाद्या गरजू कुटुंबातून मदतीचा फोन आला की गजू तत्पर. रुग्णाच्या कुटुंबाने मदत मागितल्यावर ते स्वतःच्या दुचाकीने धाव घेत हवी नको ती मदत देत. त्याची हि धावपळ सर्व हिंगणघाटकरांना माहित. म्हणून काही मित्रांनी मिळून पैसे गोळा केले व त्यास एक जुनी कार भेट दिली. यामुळे गजूचे काम अधिक सोपे होणार हि भावना. घरी कार आल्याने त्यांचे कुटुंब खुश. गाडीत फिरायला मिळणार याचा आनंद झाला. पण तो काही वेळच टिकला. कारण गजूने ठरविले की ही कार विकून रुग्णवाहीका विकत घ्यायची. जेणेकरून रुग्णसेवा अधिक तत्परतेने करता येइल. लगेच निर्णय अंमलात आणला. नवी घेणे शक्य नसल्याने त्याने गावात जुन्या रुग्णवाहिकेचा शोध घेतला. अखेर एक जुनी विकावू मिळाली. कार विकून आलेले पैसे देत ती खरेदी केली. आता ही जुनी रुग्णवाहीका सज्ज असावी म्हणून एका गॅरेज मध्ये दुरुस्तीस दिली आहे. काम झाले की याच रुग्णवाहिकेची मदत हिंगणघाटकरांना होणार. सेवेत भर पडणार.

आणखी वाचा-जिल्हा बँक नोकरभरती : परीक्षा केंद्र बदलल्याने आर्थिक भुर्दंड, परीक्षार्थीचा आरोप…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गजू कुबडे म्हणतात की हिंगणघाटमधून राष्ट्रीय व अन्य मार्ग जातात. त्यावर नेहमी अपघात होत असतात. या अपघातात जखमी होणाऱ्या अनेकांना वेळेवर मदत मिळत नाही. म्हणून कधी कधी त्यांचे प्राण जातात. म्हणून गावात अन्य रुग्णावाहीका असल्या तरी आपली स्वतःची अशी गाडी असल्यास तत्पर सेवा देता येइल असा विचार केला. आता या रुग्णावाहिकेतून मी अपघातग्रस्त व्यक्तींना विनामूल्य रुग्णालयात दाखल करू शकणार. तसेच गरीब परिवारातील रुग्णांना सेवाग्राम, सावंगी व वर्धा येथील रुग्णालयात स्वतः दाखल करण्याची जबाबदारी घेणार.ही कार विकून घेतलेली रुग्णावाहीका विविध दुरुस्तीसाठी गॅरेज मध्ये उभी आहे. कमी खर्चात ते काम करून मिळणार. गाडी ठणठण झाली की मग गजू कुबडे यांच्या रुग्णसेवेस अधिक वेग येणार. या औदार्यपर कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.