गोंदिया : रविवार २३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिवरामटोला येथील एक महिला अनुसया धानु कोल्हे (४५) रा. शिवरामटोला ही मोहफुले संकलित करण्यासाठी गावा नजीकच्या वनविकास महामंडळाच्या (एफ डी सी एम) जंगल परिसरात गेली असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले होते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी वाघाला जेरबंद करण्यात तरबेज असलेल्या बचाव पथकाला (रेस्कु टीम) पाचारण करून अत्यंत शिताफीने त्या नारी भक्षी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला त्यात तो वाघ सायंकाळच्या सुमारास अलगद अडकताच वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी नेहमी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. या घटनेमुळे परिसरात वन्य प्राण्यांची मोठी दहशत निर्माण झाली . वाघाला जेरबंद करण्याची प्रक्रिया खूप उशिरा पर्यंत सुरू असल्याने वाघ जेरबंद झाला की नाही. याविषयी नागरिकांत खूप भीतीचे वातावरण होते अशातच वनविभागाकडून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने जेरबंद केलेले रेसकु टीमचे वाहन आले व सरळ नागरिकांना याची सूचना न देताच पुढे गेल्याने उपस्थित गावकर्यांसह नागरिकात संभ्रमाची स्थिती तयार झाली होती गावकरी आक्रमक होऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्याच्या वाहनाला काही वेळासाठी अडकाव करत विरोध केला लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलीस प्रशासनाला निरोप देऊन बंदोबस्त मागविला. अखेर पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्थानिक गावातील नागरिकांना जेरबंद केलेला वाघ हा तोच आहे. याची खात्री पटवून दिल्याने गावकऱ्यांचा संभ्रम दूर झाला.

वाघ दीड ते पावणेदोन वर्षाचा

रेस्क्यू करण्यात आलेला वाघ हा अंदाजे दीड ते पावणे दोन वर्षाचा आहे. त्याचे वजन सव्वा क्विंटलच्या वर असावे, असा अंदाज रेस्क्यू टीमने वर्तविला आहे. जेरबंद झालेल्या वाघाला प्राथमिक उपचाराकरिता नवेगावबांध येथून नंतर नागपूर येथे हलविण्यात येणार असे सांगण्यात आले.रेस्क्यू टीममध्ये एनएनटीआरची टीम, साकोली येथून डॉ. मेघराज तुलावी, हेड कॉन्स्टेबल पराग भुते, आशिष रामटेके, कैलास झोडे, नूतन भंडारकर तर गोंदिया येथील रेस्क्यू टीममध्ये अमोल चौबे, सतीश बेंद्रे, विक्रांत ब्राह्मणकर, शुभम मेश्राम, राकेश ढोक, टिंकू डोंगरवार, दिनेश सोनटक्के, पृथ्वी सयाम यांच्या समावेश होता. यासाठी हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे रुपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी व आशिष दुबे यांचेही सहकार्य लाभले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर ची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार, नवेगाव बांध येथील सहायक वन संरक्षक अविनाश मेश्राम, गोठणगावचे क्षेत्र सहायक शैलेंद्र भदाणे, केशोरीचे क्षेत्र सहायक पठाण, वनरक्षक संजय परशुरामकर, वाय. एम. परशुरामकर, गवाले, जारवाल, मंगर, मेश्राम, लटके, मुंडे, वनरक्षक एस. परशुराम, मडावी, चौधरी, अभिजीत देशमुख, ए. एम. हरिणखेडे तथा अन्य वन कर्मचारी यांनी पार पाडली. वन विभागाकडून मृत महिला अनुसया धानु कोल्हे (४५) रा. शिवरामटोला यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत दिली जाणार असे नवेगावबांध चे वनपरीक्षेत्राधिकारी मिलिंद पवार यांनी यावेळी सांगितले.