अमरावती : मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे. याच अनास्थेचा भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. खुटीदाजवळ असलेल्या खंडू नदीने एका ग्रामस्थाचा बळी घेतला असून, प्रशासकीय दिरंगाई आणि वनविभागाच्या उदासीनतेमुळे मेळघाटातील विकास कसा रखडला आहे, हे या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

एकताई गावातील रहिवासी रावजी रोना भिलवेकर (वय ४५) हे खुटीदाजवळ खंडू नदी पार करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह नंतर काही अंतरावर सुमिता पुलाजवळ सापडला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सीईओंच्या भेटीनंतरही ‘जैसे थे’ परिस्थिती गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांनी खुटीदा गावाला भेट देऊन, स्वतः नदी पार करत ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. दररोज नदी ओलांडताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या. त्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे ग्रामस्थांना प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील अशी आशा वाटली होती.

मात्र, आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आमच्या समस्या समजून घेतल्या, पण वनविभागाच्या परवानगीमुळे काम थांबले आहे, असे सांगितले जाते. मग आमच्या जीवाचे काय?, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या आणि वनविभागाच्या या ‘खेळी’मध्ये आपला बळी जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

वनविभागाची ‘अनास्था’, विकास रखडला

मेळघाटातील विकासकामांमध्ये वनविभागाची परवानगी हा एक मोठा अडथळा ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या खंडू नदीवरील पुलाचे काम याच कारणामुळे थांबले आहे. केवळ पूलच नाही, तर अनेक गावांना जोडणारे रस्ते आणि वीजपुरवठा प्रकल्पही याच ‘अडचणी’मुळे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. अनेक गावांना आजही विजेविना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.

जंगल वाचवणे महत्त्वाचे आहे, पण जंगलात राहणाऱ्या माणसांना वाचवणे त्याहून अधिक महत्त्वाचे नाही का? दररोज मृत्यूचा धोका पत्करून आम्ही जीवन जगतो आहोत. प्रशासकीय दिरंगाईमुळे आमच्या आयुष्यावर मृत्यूचा शिक्का बसत आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

  • वनविभागाने तातडीने परवानग्या देऊन पूल, रस्ते आणि वीजपुरवठ्याची कामे त्वरित सुरू करावीत.
  • मृत रावजी भिलवेकर यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी.
  • या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.