Heavy Rain In Maharashtra नागपूर : राजधानी मुंबईसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा येथे पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात येत्या २४ तासात २०४ मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून आज पालघर, पुणे घाट परिसर तसे ह विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याला “रेड अलर्ट” देण्यात आला आहे. भारतीय हवामान खाते व आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सूचना दिल्या आहेत.
या जिल्ह्यांना अलर्ट
ठाणे, मुंबई आणि संपूर्ण कोकण विभाग, जळगाव, नाशिक घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत ११५ ते २०४ मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर याच कालावधीत वादळी वारे ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट येण्याचीही शक्यता आहे.
विदर्भात पावसाची स्थिती
पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात आज शनिवार, २६ जुलैला ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा “रेड अलर्ट” देण्यात आलाय. तर नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांना मुसळधार ते खूप मुसळधार पावसाचा “ऑरेंज अलर्ट” घोषित करण्यात आला आहे. उर्वरित संपूर्ण पश्चिम विदर्भात “येलो अलर्ट” जाहीर करण्यात आला असून कित्येक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय.
समुद्राला भरती
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १.२० वाजता कोकण किनारपट्टीवर (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) समुद्राला मोठी भरती येणार आहे. लाटांची उंची सुमारे ४.६७ मीटर इतकी असेल. या काळात समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
खबरदारीचा इशारा
हवामान खात्याने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खबरदारीचा इशारा दिलाय. पूरग्रस्त भागात प्रवास टाळा, घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घ्या, आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी जाणे टाळ्याचे आवाहन करण्यात आले आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांनी समुद्रकिनारी जाणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे भरतीच्या वेळी सावधगिरी बाळग्याचे आवाहन करण्यात आले आहे