बुलढाणा : पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील ऐतिहासिक, धार्मिक, जागतीकस्तरावरील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीकरिता आणि दिल्लीवरून संभाजीनगरपर्यंत नव्याने दोन विमानसेवा फेऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय विमान वाहतुकमंत्री किंजरापू नायडु यांच्याकडे यासंदर्भात मागणी व पाठपुरावा केला. याला मंजुरी मिळाली असून ही विमान सेवा २६ ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे.

पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याला लागूनच असलेले मराठवाड्यातील संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवास सेवेसाठी जवळचे आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ, लोणार येथे जगविख्यात खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आहेत . राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे आहे . संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहेत. या ऐतिहासिक , धार्मिक ,आणि पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात .

बुलढाणा, संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, येथील व्यापाऱ्यांना दिल्ली येथे व्यापारा निमित्त जाण्या येण्यासाठी सध्या, दिल्ली आणि संभाजीनगर दरम्यान दररोज दोन (इंडिगो-६ई २३२४ आणि एअर इंडियाची ए१४४३) सेवा सुरू आहे. पूर्वी संध्याकाळी (०६.५० वाजता) एअर इंडिया (दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली) ची अतिरिक्त विमानसेवा बंद करण्यात आली होती. ती सेवा पुन्हा करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापु नायडु यांच्या कडे केली होती.

ही मागणी पूर्ण झाली असून आता पूर्वीच्या दोन आणि नव्याने सुरू झालेली दोन अतिरिक्त विमानसेवा दिल्लीसाठी सुरू होत आहे. ही विमान सेवा २६ ऑक्टोबर पासून पर्यटकासाठी उपलब्ध होणार आहे.संभाजीनगर वरून दिल्लीकडे हे विमान सकाळी ८ वा ४० मिनिटांनी आणि संध्याकाळी ४.३० वा जाणार आहे. दिल्लीवरून संभाजीनगरकडे सकाळी ६ वाजता आणि दुपारी ३ वाजता निघणार आहे.