अकोला : ‘वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?,’ असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राज्यातील मंत्र्यांचे कृत्य व वक्तव्ये चांगलेच गाजत आहेत. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणावरून नुकतेच मंत्र्यांचे खातेबदल करण्यात आले. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावून हे सहन केल्या जाणार नाही, अशी तंबी देखील दिली. त्यानंतरही बदल झाल्याचे दिसून येत नाही.
अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाषणादरम्यान ते म्हणाले, ‘आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?.’ संजय शिरसाट यांनी बेधडकपणे केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात १२० वसतिगृहे उभारली जाणार
गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात १२० वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम राज्यातील वसतिगृहाची पाहणी केली होती. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा अधिक व चांगल्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन १२० वसतिगृहांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात ठिकठिकाणी, तसेच तालुकास्तरावरही वसतिगृहे निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ परिसराचा, तसेच महाड येथे चवदार तळे परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय भवनामुळे विभागाची सगळी कार्यालये एकाच परिसरात आल्याने नागरिकांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.