नागपूर : नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ताफ्यात अद्यावत शल्यक्रिया गृह आणि सिम्युलेशन लॅब दाखल झाली आहे. या दोन्हीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यामुळे रुग्णांसह विद्यार्थ्यांना काय लाभ होणार? याबाबत आपण जाणून घेऊ या.

शासकीय दंत महाविद्यालयातील कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता व विभागीय संचालक डॉ. राज गजभिये, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, डॉ. प्रशांत पंदिलवार, डॉ. वर्षा मानेकर, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. धीरज कालरा उपस्थित होते. माॅड्युलर शल्यक्रियागृहामुळे प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे. सोबत या शल्यक्रिया गृहात एचईपीए फिल्टर्स, लॅमिनार एअर फ्लो यांसारखी आधुनिक प्रणाली आहे. त्यामुळे शल्यक्रिया गृहात जीवाणू आणि धूळ नियंत्रणास मदत होते. या शल्यक्रिया गृहात साफसफाई आणि निर्जंतुकीकरण सोपे आहे.

शल्यक्रिया गृहाचा पृष्ठभाग साधे, गुळगुळीत आणि अँटी- बॅक्टेरियल आहे. त्यामुळे त्याची स्वच्छता आणि निर्जतुकीकरण सोपे होते. हे शल्यक्रिया गृह प्री- फॅब्रिकेटेड युनिट्समधून बनवले गेले आहे. त्यामुळे पारंपारिक शल्यक्रिया गृहाच्या तुलनेत त्याची उभारणी कमी अवधित होते. या शल्यक्रिया गृहाच्या डिझाईनमध्ये लवचिकता असते. त्यामुळे भविष्यात शल्यक्रिया गृहात बदल किंवा त्याचे श्रेणीवर्धन व अपग्रेड करणे सोपे होते. या शल्यक्रिया गृहाचे मॉड्युलर पार्ट्स सहज बदलता येते. एनएबीएच संस्थेच्या मानंकनानुसार शल्यक्रिया गृहाचे डिझाइन केले गेले असल्याने रुग्ण आणि डॉक्टर दोघांच्याही सुरक्षेला प्राधान्य दिले गेले असल्याचेही कार्यक्रमात सांगण्यात आले. दरम्यान प्रगत एअर हँडलिंग युनिट्स आणि इन्सुलेटेड पॅनेल्समुळे येथे ऊर्जा बचत होते. मॉड्युलर सिस्टममध्ये मेंटेनन्स करणे सोपे असते आणि आवश्यक असल्यास भाग बदलता येत असल्याचेही कार्यक्रमात सांगण्यात आले. या शल्यक्रिया गृहामुळे गरीबांवर जागतिक दर्जाची सुविधा शासकीय दंत महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाला डॉ. वैभव कारेमोरे यांच्यासह सगळे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिम्युलेशन लॅबचे महत्व

सिम्युलेशन लॅबमध्ये वि‌द्यार्थ्यासाठी तीन सिम्युलेशन खुर्चा बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शल्यक्रिया शिकण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि कौशल्य सुधारता येईल. ही देशातील पहिली आणि अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण घेता येईल. लॅबमध्ये वि‌द्यार्थ्यांना वास्तविक तसेच अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात काम करता येईल. यात आवश्यक तेवढे एक्स-रे आणि दंतप्रक्रिया शिकण्यास मदत होणार आहे. वास्तविक उपकरणांच्या मदतीने टायपोडोन्ट दातांवर थ्रीडी तंत्रज्ञाना‌द्वारे आधुनिक उपचार पद्धती शिकवली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.