नागपूर: बुटीबोरी येथील मोरारजी टेक्सटाईल मील आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ मागितला होता. मात्र तो न दिला गेल्याने संतप्त झालेल्या आंदोलक कामगारांनी दिवाळी अंधारात जाणार असल्याचा आक्रोश करीत डोंगरगाव येथे मोर्चा काढून महामार्गावरील वाहतूक अडवून धरली. त्यामुळे सकाळपासून डोंगरगावात तणावाचे वातावरण आहे.

इंटकच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारा हा मोर्चा बुटीबोरी प्रकल्प ते मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत काढला जाणार होता. मात्र पोलीसांनी त्याला परवानगी दिली नाही. जनशक्ती विदर्भ कामगार संघटना आणि इंटरच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वेळ मागितली होती. त्यासाठी आंदोलनकांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीवर मोर्चाचाही इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी ना आंदोलनाला परवानगी दिली ना मुख्यमंत्र्यांनी वळ दिली.

त्यामुळे एन दिवाळीत सरकार एकून घ्यायला तयार नसल्याने संतप्त झालेल्या मोरारजी मिल्स मधील कामगार आंदोलकांनी गुरुवारी सकाळीच वर्धा महामार्गावर ३०० ते ४०० कामगारांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. रामगिरीच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी वर्धा मार्गावर अडवून ठेवल्याने आंदोलन आणखी संतप्त झाले. त्यांनी आंदोलन तिवृ केल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली. त्यानंतर भानावर आलेल्या पोलिसांनी ग्रामीण आणि शहराला लागून असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांमधून अतिरिक्त पोलीस कुमक रवाना केली. या घडामोडीत आंदोलनाला उग्र रुप आल्याने पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे तणाव आणखीन वाढला.

अनेक महिन्यांचे वेतन थकले, दिवाळी अंधारात

अनेक महिन्यांपासूने वेतन थकल्याने मोरारजी मिल्सममधील कामगार आंदोलन करत आहेत. मात्र या मुद्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेने या मुद्यावर मध्यस्थी करून तोडगा काढण्याची मागणी करत आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. मात्र ती न मिळाल्याने आंदोलक पायीच वर्धा मार्गावरून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून ठेवल्याने हा तणाव वाढला.