महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : राज्यात ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप वाढत आहे. करोनाच्या (१.८२ टक्के)  तुलनेत स्वाईन फ्लूचा (४.२० टक्के) मृत्युदर अडीच पट अधिक असल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील एकूण मृत्यूंपैकी ७६ टक्के ‘स्वाईन फ्लू’चे बळी हे केवळ पाच महापालिका हद्द वा जिल्ह्यांतील आहेत.

राज्यात मार्च २०२० पासून ४ सप्टेंबर २०२२ पर्यंत करोनाचे ८१ लाख ४ हजार ८५४ रुग्ण आढळले. त्यापैकी १ लाख ४८ हजार २६४ रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्युदर १.८२ टक्के आहे. तर ९८.०७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाच्या पहिल्या दोन वर्षांत राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण नगण्य होते. परंतु गेल्या दोन ते अडीच महिन्यांत अचानक या आजाराने डोके वर काढले. आरोग्य खात्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमच्या अहवलानुसार राज्यात २०२२ मध्ये करोनाचे २ हजार ६६१ रुग्ण आढळले. त्यापैकी ४ सप्टेंबपर्यंत ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्युदर ४.२० टक्के आहे.

दरम्यान, राज्यातील स्वाईन फ्लूच्या एकूण ११२ मृत्यूंपैकी ८५ रुग्णांचा मृत्यू (७५.८९ टक्के) हे पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, नागपूर या पाच महापालिका वा जिल्ह्यातील आहेत. सर्वाधिक ३६ मृत्यू पुणे येथील आहेत. येथे ८५७ रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूरला १६८ रुग्णांपैकी १५ रुग्णांचा मृत्यू, नाशिकमध्ये २१७ रुग्णांपैकी १६ रुग्णांचा मृत्यू, ठाणे येथे ३५३ रुग्णांपैकी ९ रुग्णांचा मृत्यू, नागपूर महापालिका हद्दीत ३३१ रुग्णांपैकी ९ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. राज्यात सर्वत्र यंदा स्वाईन फ्लूचा मृत्युदर जास्त असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या रुग्ण व मृत्युसंख्येला राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दुजोरा दिला. मुंबईत या आजाराचे ३६१ रुग्ण नोंदवले असले तरी ३ रुग्णांचाच मृत्यू असल्याने मृत्युदर केवळ ०.८३ टक्के आहे, हे विशेष.

राज्यातील स्वाईन फ्लूची स्थिती

(१ जानेवारी ते १ सप्टेंबर २०२२)

महापालिका / जिल्हा     रुग्ण   मृत्यू

मुंबई                ३६१   ०३

पुणे                ८५७    ३६

ठाणे महापालिका         ३५३   ०९ 

कोल्हापूर              १६८    १५ 

नाशिक                २१७    १६ 

नागपूर महापालिका      ३३१    ०९