भंडारा : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून कार्यकर्ते आणण्यात आले. मात्र भंडारा येथील बचत गटाच्या शेकडो महिलांना फिरायला जायचे असे सांगून त्यांना अंधारात ठेवून छञपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. या महिलांना बचत गटातर्फे फिरायला आणले नसून बच्चू कडू यांच्या मोर्चासाठी नेण्यात आल्याचे लक्षात येताच महिलांनी भंडारा येथील प्रहारचे अध्यक्ष अंकुश वंजारी आणि पदाधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॉल बंद करून ठेवला असल्याने या सर्व महिला तेथे अडकून पडल्या आहेत. या महिलांना वाऱ्यावर सोडून पदाधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने 'लोकसत्ता'शी बोलताना या महिलांनी त्यांना जिल्ह्यात परत आणण्यासाठी विनंती केली आहे. या बाबत कवलेवडा येथील गीता बंसोड या महिलेने सांगितले की, सीआरपीआयच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना फिरायला न्यायचे असल्याचा संदेश बचत गटाच्या ग्रूपवर टाकण्यात आला. त्यानुसार महिलांना आधार नंबर आणि मोबाईल नंबर मागण्यात आला. कवलेवडा येथील आठ ते दहा बचत गटाच्या महिलांनी मीटिंग घेऊन त्यांना औंरंगाबाद, शेगाव आणि शिर्डी येथे दोन दिवसीय सहलीसाठी नेत असल्याचे सांगण्यात आले. रुपाली वरठे यांनी त्यांना अशी माहिती दिली. फिरायला जायचे म्हणून सर्व महिला तयार झाल्या. काल दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या महिलांना घ्यायला ट्रॅव्हल्स येणार होत्या मात्र त्या ट्रॅव्हल्स दोन तास उशिरा १२ वाजता पोहचल्या. कवलेवाडा गावात १० गट असून त्यातील ६० महिला तर गुंथारा, खुटसावरी, चांदोरी, धारगाव, पहेला, टेकेपार, सातोना, खुर्शीपर अशा विविध गावांतील महिलांना जवळपास तीस ट्रॅव्हलने नेण्यात आले. मौदा येथे पोहचल्यावर या महिलांना कार्ड दिले आणि सांगण्यात आले की, बच्चू कडू यांची रॅली आहे त्यात आपल्याला सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी त्यांना कार्ड देण्यात आले. हे कळताच काही महिला तेथून गावी परत आल्या. मात्र असे सांगितल्यावर महिला परत जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी इतर महिलांना छत्रपती संभाजीनगरला पोहचल्यावर सांगायचे ठरवले. हेही वाचा : “उदय मेघेने पाठीत खंजीर खूपसला, त्याला पाडणारच”, ‘यांनी’ व्यक्त केला संताप आज सकाळी या महिला छत्रपती संभाजीनगरला पोहचल्यावर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे कळले. या महिलांनी प्रहारच्या मोर्च्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. काल रात्री महिलांना थांबण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स थांबवून ट्रॅव्हल्समध्येच महिलांना रात्र काढावी लागली. सकाळी ८.३० वाजता ट्रॅव्हल्स पोहचल्या. सकाळपासून या महिलांची जेवणाची, नास्त्याची, राहण्याची किंवा इतर कुठलीही सोय करण्यात आलेली नाही. भंडारा येथील प्रहारचे पदाधिकारी मोबाईल बंद करून बसले सल्याचे बंसोंड यांनी सांगितले. या महिला स्वगावी परत येण्यासाठी धडपडत आहे. मात्र अनोळखी ठिकाणी अडकल्याने कुणाला मदत मागायची याबाबत महिलांना संभ्रम निर्माण झाला आहे. महिलांना वाऱ्यावर सोडून प्रहारचे पदाधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने या महिला संतापल्या आहेत. हेही वाचा : अमरावती : कारागृह प्रशासन अवाक्! कैद्याने तयार केला स्वत:चा बनावट शिक्षामाफी आदेश… सात ट्रॅव्हल्ससह महिला आता छत्रपती संभाजीनगर येथील कदिम जालना पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे गीता बनसोड यांनी आता सांगितले. एका ट्रॅव्हलमध्ये ६० महिला आहे. अंदाजे ४०० ते ४२० महिला पोलिस ठाण्यात पोहचल्या आहेत. बाकी ट्रॅव्हल कार्यक्रम स्थळी अडवून ठेवण्यात आल्या आहेत.