नागपूर : भाजपची कट्टर हिंदूत्वाचे पुरस्कर्ते असलेला पक्ष म्हणून ओळख आहे. परंतु भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात महाराष्ट्रातील भाविकांना नागद्वार यात्रेसाठी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला मध्य प्रदेश परिवहन विभागाने परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील भाविकांची नागद्वार यात्रेत जाण्यासाठी कोंडी होणार आहे.

मध्य प्रदेशातील नागद्वार येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. त्यासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येत भाविक जातात. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाकडून मोठ्या संख्येने बसेस सोडल्या जातात. यंदाही महामंडळाने ४८ बसेसचे नियोजन केले व तात्पुरत्या परवान्यासाठी मध्य प्रदेश परिवहन कार्यालयाकडे अर्ज केला. परंतु मध्य प्रदेश परिवहन विभागाने किमान ५० आसन क्षमता असलेल्या बसलाच परवाना देणार असल्याचे सांगितले. एसटीची आसन क्षमता ४४ आहे. त्यामुळे नवीन पेच निर्माण झाला आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये नोंदणी असलेल्या व मध्य प्रदेश परिवहन कार्यालयाने परवाना दिलेल्या अनेक खासगी बसेस महाराष्ट्रात सर्रास धावत असतात. यातील अनेक बसेसची आसन क्षमता पन्नासहून कमी आहे. तरीही या बसेसला महाराष्ट्रात परवाना दिला जातो. ४४ आसन क्षमता असलेल्या एसटी महामंडळाच्याच बसेस शिवनी, इंदूर, राजनांदगाव, बैतुल शहरात नियमित धावतात.

परंतु, आता या बसेसलाही नव्याने परवाना न देण्याचा इशारा मध्य प्रदेश परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील परिवहन कार्यालयात वाद उफाळण्याची शक्यता आहे. याबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

एसटी महामंडळाचे म्हणणे काय ?

मध्य प्रदेशच्या परिवहन आयुक्त कार्यालयाला राज्यातील परिवहन आयुक्तांनी पत्र दिले असून नागद्वार यात्रेसाठी परवाना देण्याची विनंती केली आहे. मध्य प्रदेशातील मोटर वाहन कायद्याची अडचण खासगी बसेससाठी आहे. ती एसटीला लागू होत नाही. लवकरच परवाना मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती लोकसत्ताशी बोलतांना एसटी महामंडळाचे नागपूर विभाग नियंत्रक विनोद चवरे यांनी दिली.

कृती समिती म्हणते… हे तर हिंदू भाविकांची…

‘मध्य प्रदेश सरकारने एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवासी वाहतुकीचा परवाना नाकारणे म्हणजे हिंदू भाविकांची कोंडी करण्यासारखे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करून तातडीने हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन लोकसत्ताशी बोलतांना श्री नागद्वार यात्रा, पचमढी बचाव कृती समितीचे कार्याध्यक्ष उमाकांत झाडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.