नागपूर : महापालिका झोन कर्मचारी, वाहतूक शाखा आणि पोलीस सगळेच आमचे ग्राहक आहेत. ते नेहमी पाहुणचार घ्यायला येतात. त्यामुळे तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाहीत. जे करायचे ते करून घ्या, अशी उघडपणे धमकी देत मुजोर झालेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी माटे चौक ते अंबाझरी तलावादरम्यानचा संपूर्ण पदपथ आणि रस्ता पुन्हा एकदा गिळंकृत केला आहे. प्रशासनाच्या जीवावर मुजोर झालेल्या या विक्रेत्यांमुळे या भागातल्या रहिवाशांचा जीव मात्र मेटाकुटीला आला आहे.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून येथे घर, व्यापारी गाळे घेतलेल्यांवर या खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. कर बुडवणाऱ्यांना अभय आणि कर भरणाऱ्यांना मनस्ताप होत असेल तर आम्ही मनपाच्या तिजोऱ्या का भरायच्या, असा थेट सवाल येथील रहिवासी करत आहेत.
रस्त्यावर कुठेही गाड्या लावत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठेलेधारकांवर कोणाचाही अंकुश उरलेला नाही. माटे चौक पेट्रोल पंपापासून ते अंबाझरी तलावाच्या पाळीपर्यंत दोन्ही मार्गांवरचे पदपथ या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना त्यांची वाहने लावण्यासाठी देखील जागा उरत नाही.
कोट्यवधींची गुंतवणूक करत या भागात गाळे खरेदी केलेल्यांना हे खाद्यपदार्थ विक्रेते आपली स्वतःची वाहने देखील लावू देत नाहीत. त्यांच्याशीच वाद घालून गुंडगिरी व दमदाटी करतात. हातठेल्यांवरच्या खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावर कुठेही अस्ताव्यस्त वाहने लावून खात बसतात. ठेलेधारक त्यांना पाठीशी घालतात. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याबद्दल हटकले तर ठेला चालवणारे उलट वाहन चालकांशीच मुजोरी करतात.
अतिक्रमण विरोधी पथकाचे झोपेचे सोंग
पदपथावर अतिक्रमण करत रस्त्यावर कुठेही गाड्या लावणाऱ्या मुजोर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना येथून हलवा, अशा तक्रारी करून रहिवासी थकले आहेत. महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या दप्तरी अशा शेकडो तक्रारींचा ढीग जमा आहे. मात्र, कुंडली मारून बसलेले अधिकारी त्यावर साचलेली धूळ झटकायला देखील तयार नाहीत. बजाजनगर, राणा प्रतापनगर पोलीस आणि महापालिकेला हे अतिक्रमण दिसत नाही, की अर्थपूर्ण व्यवहारामुळे त्याकडे पहायचे नाही, अशी शंका रहिवाशांना येत आहे.
रस्त्यावरची फोडणी अन् डोळ्यांना इजा
या भागातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणारे तरुण आणि विद्यार्थ्यांना चमचमीत खायची चटक लागली आहे. त्यांची भूक भागवण्यासाठी रस्ते आणि पदपथावर कब्जा केलेले खाद्यपदार्थ विक्रेते मनमानी पद्धतीने पदार्थांना फोडणीचा तडका देतात. त्यामुळे गरम तेल, तिखटाचे शिंतोडे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या डोळ्यांत उडतात. यामुळे डोळ्यांना इजा होत असून अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, याचे ना वाहतूक शाखेला काही देणे घेणे आहे ना पोलिसांना की महापालिकेला.
प्रशासनाच्या बुद्धीला नाकर्तेपणाचा गंज
एरवी या रस्त्यावरून जाताना वाहतूक शाखा, पोलीस आणि महापालिका प्रशासनाला हातठेले धारकांकडे वाकड्या नजरेने साधे पाहण्याची देखील गरज वाटत नाही. मात्र, एखाद्या कार्यक्रमासाठी जर नेते अथवा मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा या रस्त्यावरून जाणार असला, की कायदा व सुव्यवस्थेच्या गप्पा हाकणाऱ्या सरकारी यंत्रणेला झोपेतून जाग येते.
नेत्यांच्या नियोजित वेळेपुरते खाद्यपदार्थ ठेलेधारकांना हटवले जाते. मात्र, पोलिसांची पाठ फिरतात, खाद्यपदार्थ विक्रेते जणू रस्ता आपल्या मालकीचाच आहे, अशा अविर्भावात पुन्हा खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावतात. त्यामुळे एरवी प्रशासनाच्या बुद्धीला नाकर्तेपणाचा गंज चढतो का असा प्रश्न पडत आहे.
सणासुदीमुळे सध्या सीताबर्डी आणि महालमधील अतिक्रमण धारकांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे इतर भागातल्या फेरीधारकांची मुजोरी वाढली आहे. वारंवार कारवाया करूनही हे ठेलेधारक पुन्हा येतात. वाहतूक शाखेकडूनही कडक कारवाई करण्याची गरज आहे. – संजय कांबळे, अतिक्रमण विरोधी पथक अधिकारी, महापालिका.
