मित्राचा वाढदिवस साजरा करून मध्यरात्रीस घरी परतत असताना क्षुल्लक कारणातून एका युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक वर्धात घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच आरोपी अल्पवयीन आहेत.

शुल्लक कारणावरून खून

आज पहाटे एक वाजता ही घटना घडली. मध्यरात्री मित्राचा वाढदिवस घराबाहेर खुल्या वातावरणात साजरा करण्याचे वेडच आजच्या तरुणाईला लागले आहे. स्थानिक हिंदनगरात राहणाऱ्या अमोल तामगाडगे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय सोनटक्के सह त्याचे काही मित्र मध्यरात्री मैदानावर आले. केक कापून घरी परतत असताना अक्षयला तीन दुचाकीवर आलेल्या मुलांनी अडवले. गाडीला कट मारला म्हणून मारहाण सुरू केली. त्यातच मुख्य आरोपी मयूर गिरी याने खिशातून चाकू काढून अक्षयच्या पोटात भोसकला.

रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच मृत्यू

याची माहिती वाढदिवस कार्यक्रमात सहभागी मित्रांना कळताच त्यांनी अक्षयला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. पण त्याअगोदरच त्याचा मृत्य झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हल्ला करणारे आरोपी पळून गेले होते, मात्र, त्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या निलेश मनोहर पटेल यास घटनाक्रम सांगितला. निलेशने घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेल्या रक्तावर माती टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मुख्य आरोपी फरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील मुख्य आरोपी मयूर गिरी फरार आहे. तर निलेश पटेल व ऋषीकेश बहेनवाल यांना अटक करण्यात आली आहे. इतर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.