नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ‘रि-कॉर्पेटिंग’ काम पूर्ण झाले असून नागपूर विमानतळावरून आता चोवीस तास विमानांचे संचालन होऊ शकणार आहे. नागपूर विमानतळावर धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम सुमारे एक वर्षापासून सुरू होते. अखेर ते ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नागपूर विमानतळावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानसेवा बंद करण्यात आली होती. ती आता पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच या विमानतळावरून नवीन विमानांची सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उन्हाळ्याच्या वेळापत्रकामध्ये इंडिगो एअरलाईन्स आणि स्टार एअरकडून तीन शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करण्यात येत आहे. तसेच काही शहरांसाठी नागपूर येथून अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे मे ते जून दरम्यान सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या नागपूर विमानतळावरून दररोज ३३ विमानांचे अवागमन सुरू आहे.
नागपूर येथून नव्याने सुरू होत असलेल्या शहरामध्ये कोल्हापूर, जयपूर आणि नोएडाचा समावेश आहे. इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-जयपूर-नागपूर उड्डाणाचा समावेश आहे. स्टार एअरची नागपूर-कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू होत आहे. हे विमान दुपारी ३.४५ वाजता नागपुरात पोहोचेल आणि ४.१५ वाजता निघेल. इंडिगोची नागपूरहून नोएडा विमानसेवा सुरू होत आहे. इंडिगो एअरलाईन्सची नागपूरहून दुपारी ४.३० वाजता सेवा राहणार आहे.
पुणे, बंगळुरू, दिल्लीसाठी अतिरिक्त विमानसेवा
इंदूर, कोलकाता, पुणे, बंगळुरू आणि दिल्लीसाठी अतिरिक्त विमानसेवा असेल. २६ जुलैपासून इंदूरचे विमान दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी नागपूर येथे उतरून दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी सुटेल. दुसरे विमान कोलकात्याहून दुपारी १२.१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि दर बुधवारी दुपारी १२.४५ वाजता डेल-हायला रवाना होईल. ३० जुलैपासून ही सेवा सुरू होणार आहे. बंगळुरूला जाणारे अतिरिक्त विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल आणि दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी बंगळुरूकडे रवाना होईल.