नागपूर : काश्मीर व मणिपूरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पराक्रम गाजवत सेना पदक मिळवलेल्या नागपूरकर लेफ्टनंट कर्नल (डॉ.) चेतन व्ही. धवड यांनी पर्यावरण विषयावर अभिनव योगदान दिले आहे. ‘भारतीय सेना : एक लढा पर्यावरणासाठी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून त्यामध्ये लष्कराच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे सखोल विश्लेषण आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच लष्करप्रमुखांच्या हस्ते झाले. लष्करी क्षेत्रातील अनुभव आणि पर्यावरणाचे भान एकत्र करून त्यांनी सैन्याच्या हरित योगदानाची प्रेरणादायी कहाणी समाजासमोर मांडली आहे.
दिल्ली येथे आयोजित आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स दरम्यान भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेन्द्र द्विवेदी यांच्या हस्ते ‘भारतीय सेना : एक लढा पर्यावरणासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक लेफ्टनंट कर्नल (डॉ.) चेतन व्ही. धवड,सेना पदक विजेते, यांनी लिहिले असून, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने भारतीय लष्कराचे योगदान अधोरेखित करणारे हे महत्त्वाचे पुस्तक ठरले आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत जनरल द्विवेदी यांनी नमूद केले आहे की, “पर्यावरणाचे रक्षण करणे हे देशाच्या संरक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे.” तसेच, त्यांनी लष्करातील जवानांना ‘क्लायमेट वॉरियर्स’ म्हणजेच पर्यावरण योद्धे बनण्याची प्रेरणा दिली आहे.
पुस्तकात हवामान बदल या जटिल विषयाचे सुलभ आणि समजण्यास सोपे विश्लेषण करण्यात आले असून, भारतीय सशस्त्र दलातील जवानांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करण्यात आले आहे.
याआधी, वर्षाच्या सुरुवातीस, ले. कर्नल धवड यांनी इंडियन डिफेन्स फोर्सस टू कॉम्बट क्लामॅट चेंज : ग्रीन डिफेन्स’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित केले होते. त्या पुस्तकात हवामान बदलाला ‘थ्रेट मल्टिप्लायर’ (धोके वाढवणारा घटक) व अनेक देशांमध्ये अस्थिरता निर्माण करणारा मुख्य कारणभूत घटक म्हणून सादर करण्यात आले आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, लष्कराच्या आपत्ती व्यवस्थापन भूमिकेत मोठी वाढ झाली असून, त्यानुसार उपकरणे, धोरणे आणि रणनीती यांचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ले. कर्नल चेतन धावड यांना मणिपूर आणि काश्मीरमधील यशस्वी दहशतवादविरोधी कारवायांसाठी सेना मेडल प्रदान करण्यात आले आहे. ते पर्यावरण अभियांत्रण विषयात आआयटी, रूडकी येथून पीएच.डी. आणि एम.टेक पदवीधारक असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण ‘सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट’, औरंगाबाद आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, नागपूर येथून घेतले आहे.