नागपूर : उन्हाळ्याच्या गर्दीमुळे नागपूर आणि बौद्धगया दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात येत आहे.नागपूर ते बौद्धगया दरम्यान मध्य रेल्वेने विशेष प्रवास भाडे आकारून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर गाडी सोडण्याची विनंती नागपुरातील काही संघटनांनी केली होती.गाडी क्रमांक ०१२०३ नागपूर ते गया विशेष गाडी १० मे(शनिवार) रोजी नागपूर येथून दुपारी ३.४० वाजता सुटेल आणि ११ मे (रविवार) रोजी रात्री ११.४५ वाजता गया येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२०४ गया ते नागपूर विशेष गाडी १३ मे (मंगळवार) रोजी गया येथून रात्री ८.३० वाजता सुटेल आणि १५ मे (गुरुवार) रोजी दुपारी ३.५० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर येथून निघेल आणि नरखेड, पांढुर्णा, आमला, बैतूल, इटारसी, जबलपूर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जं., भभुआ रोड, सासाराम, डेहरी ऑन सोन मार्गे गया येथे पोहोचेल.या गाडीला एकूण १८ डबे असतील. यात दोन लगेज कम गार्ड व्हॅन (जनरेटरसह), सहा सामान्य, चार तृतीय वातानुकूलित (इकोनॉमी), एक द्वितीय वातानुकूलित आणि पाच स्लीपर श्रेणीचे डबे राहतील.

दरम्यान, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्धगया येथे सुरू आहे. आंदोलनकाऱ्यांना सर्वाधिक अपेक्षा महाराष्ट्राकडून आहेत. त्यासाठी अनेक संघटना कामास लागल्या आहेत. त्यांच्या दोनच मागण्या आहेत. बौध्दगया महाविहार बौध्दाच्या हातात सोपवा. १९४९ चा काळा कायदा रद्द करा. शांततामय मार्गाने सरकारला मागण्या मंजूर करण्यास भाग पाडावयाचे आहे. १२ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बौध्दगयेत सुरू झाले. १२ मे रोजी ते देशव्यापी होत आहे. त्यासाठी उरूवेला कॉलनीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोशिएशनच्या सभागृहात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. यावेळी बौद्धगया महाविकार आणि आंदोलन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१२९ देशात बौध्द आहेत. सहा अधिकृत बौध्दराष्ट्र आहेत. त्यामध्ये थायलँड, म्यानमार , श्रीलंका , लाओस, कंबोडिया, भूतान या देशांचा समावेश आहे. बौध्द बहुसंख्ये असलेल्या देशांची संख्या १८ आहे. आपल्यासह त्यांच्यासा़ठी महाबोधी महाविहार अस्मितेचा व स्वाभीमानाचा प्रश्न बनला आहे. युनोस्कोने २००२ ला महाबोधि विहाराला जागतिक पुरातत्त्व वास्तूचा दर्जा दिला. त्याने इतिहास व बौध्द धार्मिक महत्त्वावर शिक्कामोर्तब झाले. तथागत बुद्धाला या नगरीत ज्ञानप्राप्त झाल्याने या नगरीला ज्ञाननगरी असेही संबोधले जाते. तिसऱ्या शताब्दीतील प्राचिन विहारांपैकी हे एक आहे. २५६७ वर्षानंतरही टिकून आहे. बोधीवृक्ष डौलाने डोलत आहे. ही पुरातत्व वास्तू आहे.