नागपूर : विदर्भात अवकाळी पावसाचे सत्र कायम असून त्याचा मोठा परिणाम शेतीवर होत आहे. डिसेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. हे संकट कायम असून हवामान खात्यानेही विदर्भाबाबत गंभीर इशारा दिला आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. आता आणखी एक चक्रीवादळ घोंगावत असून राज्यातील वातावरणावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. येत्या २४ तासात विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा : वैध चलनात ३० लाख परत करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; जुन्या नोटा जप्त प्रकरण
विदर्भात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असताना अवकाळी पावसामुळे त्यात पुन्हा खंड पडला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मोसमी पाऊस म्हणावा तसा पडला नाही आणि आता डिसेंबर उजाडूनही थंडी पडायला तयार नाही, त्यामुळे हिवाळ्याची चाहूल यंदा जाणवली नाही. भारतीय हवामान खात्याने सुद्धा यंदा थंडी जाणवणार नाही असे सांगितले आहे.