नागपूर : रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, आघाडीचा घटक असूनही काँग्रेस पक्षातील नेते काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहे. काँग्रेसची ही भूमिका संशयास्पद असून त्यांना छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांनी केला.याची तक्रार शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही याकडे लक्ष द्यावे व हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी बरबटे यांनी केली.

आरोप काय आहे?

रामटेक मतदारसंघातील संपूर्ण घटनाक्रम फार वेदनादायक आहे. पूर्व विदर्भात एकूण २८ मतदारसंघ आहे. त्यापैकी केवळ एकच रामटेक मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या उबाठा गटाला दिली गेली. त्यावरही काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. ते अर्ज मागे घेतील, असे वाटले. मात्र, सगळा घटनाक्रम आश्चर्यचकित करणारा आहे. आता तर काँग्रेसचे नेते बंडखोराच्या प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादी गट संपूर्ण ताकदीने प्रचारात साथ देत आहे. मात्र काँग्रेसचे वागणे आघाडीच्या धर्माविरोधात आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढा देण्याऐवजी आपसात लढा द्यावा लागत आहे, असे विशाल बरबटे यांनी सांगितले. घडणाऱ्या घटनाक्रमाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात आहोत. वरिष्ठ नेते लवकरच यावर तोडगा काढतील असा विश्वास बरबटे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे राज्य संघटक सागर डबरासे, जिल्हाप्रमुख उत्तम कापसे उपस्थित होते.

हेही वाचा…माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, ‘काँग्रेसचे अस्तित्व…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मित्रपक्षांच्या जागेवर डोळा?

नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या कोट्यात तीन जागा होत्या. त्यांना जर बंडखोर प्रिय होता तर त्याला तिथून उमेदवारी द्यायची होती. आधी आपल्या हक्काच्या जागा घ्यायच्या व नंतर मित्रपक्षांच्या जागांवर डोळा ठेवायचा, ही काँग्रेसची रणनीती चुकीची आहे. काँग्रेसकडून सोयीचे राजकारण केले जात आहे. जागावाटप झाल्यावर मित्रपक्षांच्या जागांचे विश्लेषण काँग्रेसकडून केले जात आहे. कॉँग्रेसची ही खेळी समजण्यापलिकडची आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असूनही कॉँग्रेसच्या अशा वागणुकीमुळे विरोधकांशी लढा द्यायचा की आपसात लढायचे, असा प्रश्न बरबटे यांनी उपस्थित केला. निलंबनाची कारवाई ही केवळ दिखावा होती असे वाटत आहे. आम्ही नाव घ्यायला घाबरत नाही, मात्र आघाडी धर्मामुळे संयमाने घेत आहोत, असेही ते म्हणाले.