नागपूर : ‘हम भारत के लोग’ या संस्थेच्या वतीने आयोजित संविधान सत्याग्रह पदयात्रेचा समारोप २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रमात झाला. विशेष बाब म्हणजे, याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी दिन, महात्मा गांधी जयंती आणि दसरा असे तीन महत्त्वाचे दिवस एकत्र आल्याने या समारोपाला अधिकच ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा २९ सप्टेंबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सुरू झाली होती. संविधान, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समतेसाठी सुरू झालेल्या या यात्रेत विविध सामाजिक संस्था, नागरिक मंचे आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी सक्रिय सहभाग घेतला.

पदयात्रेदरम्यान विविध गावांत सभांद्वारे नागरिकांशी संवाद साधण्यात आला. संविधानाच्या मूलभूत तत्त्वांविषयी जनजागृती करण्यात आली. धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तत्त्वांचा पुनः उच्चार करत, संविधानाचा अवमान थांबवण्याचा संदेश यात्रेद्वारे दिला जाणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राममध्ये पदयात्रेचा समारोप आणि जाहीर सभा आहे.

दुसरीकडे, याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी दिन साजरा केला. नागपूरमधील रेमीबागमध्ये संघाचा विजयादशमी सोहळा आणि वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी एकीकडे सत्याग्रहाची शपथ घेतली जात असतानाच, संघाच्या शताब्दी दिनानेही देशातील वैचारिक संघर्षाचे दर्शन घडवले जाण्याची शक्यता आहे. हा योगायोग नव्हे तर लोकशाहीतील वैविध्य आणि संघर्षाचे प्रतीक असल्याचे निरीक्षण अनेक तज्ज्ञांनी नोंदवले आहे. देशातील लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि संविधान रक्षणाचा संदेश पोहोचवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपत, त्यांच्या पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.

राजकीय पक्षांबरोबरच अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी गट, महिला संघटना आणि युवक संघटनांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येण्याची ही गरज अधोरेखित करत या यात्रेला व्यापक समर्थन मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी दिन यंदा २ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, नागपूरमधील रेशीमबाग येथील मुख्यालयात आयोजित मुख्य सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या या ऐतिहासिक पर्वाला अधिक व्यापक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी विविध देशांतील नागरिकांना आणि प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे.

संघाच्या स्थापनेपासून १०० वर्षे पूर्ण होत असल्याने हा शताब्दी दिन संघ परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यानिमित्ताने देशभरातून हजारो स्वयंसेवक, पदाधिकारी आणि संघाचे विविध घटक नागपूरमध्ये एकत्र येणार आहेत.या ऐतिहासिक दिवशी, दुसऱ्या बाजूला तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’चा समारोप सेवाग्राममध्ये होत आहे. दोन्ही घटना एकाच दिवशी होत असल्याने नागपूर आणि वर्धा परिसरात विशेष वातावरण निर्माण होणार आहे.