माकडांना पुराच्या पाण्यातून सोडवण्यासाठी वनखात्याने स्वयंसेवींच्या मदतीने ‘हरितसेतू’ उभारला आहे. या सेतूच्या सहाय्याने ते बाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे.

नागपूरपासून १५-२० किलोमीटर अंतरावरील गोरेवाडालगतच्या माहूरझरी गावालगत तलावात गेल्या काही दिवसांपासून अति उच्चदाब विजेच्या मनोऱ्यावर सात माकडे अडकून पडली आहेत. तीन दिवसांपूर्वी वनविभागाने त्यांना सोडवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मनोऱ्याच्या सभोवताल पाणी असल्याने मोहिमेत अडचणी येत होत्या. पहिल्या दिवशी दोर बांधून माकडांना काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलानेही प्रयत्न करून पाहिला, पण हा प्रयत्न सुद्धा फसला.

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने बांधण्यात आला सेतू –

आता वनखात्याने स्वयंसेवींच्या सहाय्याने मोहीम सुरू केली. ड्रम आणून त्याचे तराफे तयार केले. ते एकमेकांना जोडून जाळीच्या सहाय्याने सेतू तयार करण्यात आला.. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने हा सेतू या मनोऱ्यापासून तर जमिनीपर्यंत बांधण्यात आला. त्यावर हिरवळ पसरवून वानरांना खाण्यासाठी फळे टाकण्यात आली आहेत. या सेतूच्या सहाय्याने ते नक्कीच बाहेर पडतील असा सर्वांना विश्वास आहे. या बचाव मोहिमेत सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्र, ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्र, अग्निशमन विभाग सहभागी होते.