नागपूर : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये १६ फेब्रुवारी रोजी स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अशा घटना घडू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व स्फोटक निर्मिती कंपन्याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुरक्षिततेचे पालन करीत आहे किंवा नाही याची काटेकोरपणे तपासणी करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात स्फोटके निर्मिती करणाऱ्या २३ कंपन्या आहेत. तेथे सुरक्षिततेची संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. स्फोटक निर्मिती कंपन्या या सदैव आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारून तत्पर असायला हव्यात. त्यामुळे अशा अस्थापनांनी सुरक्षेची अतिशय काळजी घेण्याची गरज असते. वारंवार जर अशा घटना घडत असतील व यात जीवितहानी होत असेल तर अशा घटना पुढे होऊ नयेत यासाठी तपासणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी यावेळी दिले.

मृतांच्या नातेवाईकांना मदत करा

मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे २० लाख तर जखमींना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला बावनकुळे यांनी यावेळी दिले. यासोबतच शासन नियमानुसार आवश्यक मदत देण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ उपलब्ध करून द्यावा, कुठल्याही कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे, पोलीस अधिकारी नरेश म्हस्के, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोया, तहसीलदार राजू रणवीर यांच्यासह कामगार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.