नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता बारावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत १.६ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच राज्यात नागपूर विभाग सलग तिसऱ्या वर्षीही ९२.१२ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावरच आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे.

नागपूर विभागाच्या निकालात २०२३-२४ मध्ये मुलांची टक्केवारी ८९.८५ टक्के होती ती यंदा ८७.४१ टक्के झाली आहे. म्हणजे मुलांच्या निकालात २.४ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मुलींची टक्केवारी २०२३-२४ मध्ये ९४.४६ इतकी होती. यंदा ती ९३.७६ टक्के आहे. दर मागील वर्षीप्रमाणे गोंदिया जिल्हा ९४.०४ टक्क्यांनी अव्वल ठरला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८१.७७ टक्यांसह सर्वात कमी आहे.

यावर्षी कॉपीमुक्त अभियानाचा निकालावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. विभागात कॉपी करणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. त्याचा परिणाम म्हणून निकालात काहीशी घट झाल्याची माहिती विभागीय अध्यक्ष चिंतामन वंजारी यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के, तर २०२३-२४ मध्ये ९२.१२ इतका होता होता. यात आता १.६ टक्क्यांनी घट झाली असून यंदा ९०.५२ टक्के झाला आहे. यावर्षी ११ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली होती.

यामध्ये नागपूर विभागातून १ लाख ५२ हजार ४६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५१ हजार ११६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९०.५२ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, तीन वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. नागपूर विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९४.४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.९६ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ८९.०५ टक्के लागला आहे.

विभागाची स्थिती

एकूण नोंदणी- १,५२,०४६

परीक्षा देणारे विद्यार्थी- १,५१,११६

उत्तीर्ण विद्यार्थी – १,३६,८०५

एकूण टक्केवारी – ९०.५२

गोंदिया – ९४.०४

गडचिरोली – ८९.१७

भंडारा – ८७.५८

चंद्रपूर – ८९.१७

नागपूर – ९३.४०

वर्धा – ८९.४०

नागपूर शाखानिहाय निकाल

विज्ञान- ९७.९६

वाणिज्य – ९०.०२

कला – ७९.०५

एमसीव्हीसी – ८२.८१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटी – ८१.४४