मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरच्या महानगपालिका निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळाल्याने त्यांची आणि सोबतच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची काॅलर ताठ झाली आहे. बहुतांशी जागांवर भाजपला चांगली आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला जबर धक्का बसला असून भाजपपाठोपाठ जागा मिळवणारा तो पक्ष ठरणार असला तरी भाजप आणि काँग्रेसच्या जागांमध्ये मोठा फरक असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघा बड्या नेत्यांचं होम टर्फ असणाऱ्या नागपूरमध्ये भाजपची स्थिती चांगली होतीच. पण त्यातही काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीने भाजपच्या या विजयाला हातभारच लागला. गेल्या काही वर्षांमध्ये नागपूरमधल्या गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षांकडून मोठी आगपाखड झाली होती.  पण तरीही या मुद्द्याच्या आधारावर महानगरपालिकेतली सत्ता खेचून आणणं काँग्रेसला शक्य झालं नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची सभा सोडली तर बड्या नेत्यांची सभा झाली नाही. काँग्रेसचे नगराध्यक्ष विकास ठाकरे यांनाही या महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. भाजपच्य़ा दिलीप दिवे यांनी त्यांचा २९२९ मतांनी पराभव करत काँग्रेसच्या नामुष्कीत वाढच केली. मुख्यमंत्री आणि नितिन गडकरींनी ३० पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि हा परिसर पिंजून काढला. काँग्रेसने तगडे उमेदवार दिले नसल्याचीही यावेळी तक्रार होती. तरीही ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद कमी होती त्या प्रभागांमध्येही जात  गडकरींनी जनतेशी संवाद साधला याचे चांगले परिणाम दिसत भाजपने नागपूर महापालिकेतली आपली सत्ता राखली आहे.

पण गडकरी गटाला आणि पर्यायाने भाजपला काही अनपेक्षित धक्केही बसले. नितीन गडकरी राहत असलेल्या प्रभागामध्ये नागपूर पालिकेतले स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांना पराभवाचा धक्का बसला. मुख्यमंत्री राहत असलेल्या प्रभागांमधले सर्व भाजप उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.

भाजपने केंद्रात राज्यात तसंच नागपूर महानगरपालिकेमध्ये केलेल्या कामांमुळे जनतेने भाजपला पुन्हा एकदा यश मिळवून दिल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरींनी दिली. आज रात्री नितीन गडकरींच्या वाड्यावर भाजपचे विजयी उमेदवार त्यांची भेट घेणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur election result 2017 analysis bjp congress gadkari fadanvis ashok chavan
First published on: 23-02-2017 at 18:56 IST