नागपूर : जंगलाचे एक वेगळेच निसर्गचक्र असते आणि जंगलावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच ते ठाऊक असते. वाघ किंवा बिबट्यासारखे प्राणी जवळपास असतील तर पक्ष्यांपासून तर माकड, हरीण यासारखे प्राणी एकमेकांना एक वेगळा आवाज देऊन “अलर्ट” करतात. मात्र, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात आक्रीतच घडले. चक्क वाघीण बिबट्याच्या मागे लागली आणि बिबट्याला तिने सळो की पळो करून सोडले. पर्यटकांसमोरच हा प्रकार घडला आणि या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले.
पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वाघाची चाहूल लागल्याने माकडांचा कळप एकमेकांना “अलर्ट” करू लागला. त्यांचा एकमेकांना अलर्ट करणारा आवाज एवढा मोठा होता की नक्कीच याठिकाणी वाघ असणार हे पर्यटकांना कळले. त्यामुळे जवळपास असलेली पर्यटक वाहने त्याठिकाणी येऊ लागली. थोड्या वेळातच पर्यटकांना त्याठिकाणी गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्याठिकाणी झाडावर म्हणजेच झाडाच्या अगदीच टोकावर एक बिबट्या बसला होता आणि तो गुरगुरत होता. त्याच्याच खाली झुडपामध्ये पेंच व्याघरप्रकल्पात “लक्ष्मी” या नावाने प्रसिद्ध असलेली वाघीण लपून बसली होती. बिबट आणि वाघाचा लपाछपीचा हा खेळ बराच वेळ सुरू होता. ती झाडाभोवती फिरत होती, बिबट्याला पाहत होती आणि नंतर झुडपाच्या आत जात होती. तू दिसेनाशी झाल्यावर बिबट झाडावरून खाली उतरला आणि उतरताना देखील तो खूप सावध होता. हळूहळू खाली उतरत होता आणि वाघिणीवर लक्ष ठेवून होता. शेवटी तो जमिनीवर उडी मारून पळू लागला. त्याचवेळी लपून बसलेली “लक्ष्मी” ही वाघीणबाहेर आली आणि तिने बिबट्यावर हल्ला केला.
पर्यटक हे दृश्य पाहून रोमांचित झाले. लक्ष्मीने बिबट्याला जोरदार थप्पड मारली आणि बिबट्याला फक्त एकच थप्पड मारता आली. त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. पर्यटकांच्या जिप्सीपासून अवघ्या काही फुटावर हा प्रकार सुरू होता. एकक्षण पर्यटकांना सुद्धा भीती वाटली. “लक्ष्मी” वाघिणीची जोरदार थप्पड बसल्यामुळे बिबट जमिनीवर पडला, काही वेळा लोळला आणि पुन्हा धावत दुसऱ्या झाडावर चढला. यावेळीही “लक्ष्मी” वाघिणीने पुन्हा त्याचा पाठलाग केला. बिबट्या हा झाडावर झरझर चढला आणि झाडाच्या टोकावर पोहोचला, पण “लक्ष्मी” वाघिणीला वरपर्यंत चढताच आले नाही. तिने पुरेपूर प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. झाडावर असलेल्या बिबट्याकडे पाहिले, पर्यटकांकडे पाहिले, पुन्हा ती झुडपात गेली. ती एका मोठ्या खडकाच्या मागे बसली, जिथून बिबट्या तिला पाहू शकत नव्हता. आता पुन्हा बिबट्याने हालचाली सुरू केल्या. तो खाली उतरू लागला. त्याआधी “लक्ष्मी” वाघिणीने खूप प्रयत्न केला, पण तिला अखेर माघार घ्यावी लागली. बिबट हाती लागणार नाही हे दिसताच ती झुडपामध्ये परत गेली.
येते, पुन्हा त्याचा पाठलाग करत. बिबट्या पुन्हा दुसऱ्या झाडावर चढला. यावेळी लक्ष्मीने त्याचा पाठलाग केला आणि त्या झाडावरही चढली. ती जवळजवळ २०/२५ फूट झाडावर चढली पण तिच्या मार्गात एक फांदी आली आणि तिला खाली यावे लागले. मग हळूहळू ती पुन्हा झुडपात गेली.
दरम्यान, पर्यटक मार्गदर्शक म्हणजेच गाईडने यामागचे कारण पर्यटकांना सांगितले. “लक्ष्मी” वाघिणीला तीन बछडे होते. एका बिबट्याने तिच्या दोन बचड्यांचा बळी घेतला. तिच्या तीन बछड्यापैकी केवळ एकच जिवंत होता. त्यामुळे तेव्हापासून “लक्ष्मी” वाघीण तिच्या अधिवासात कुणालाच फिरकू देत नव्हती. बिबट दिसला की ती त्याला सळो की पळो करून सोडायची.