नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे उत्तर नागपुरातील कमाल चौक-दक्षिण नागपुरातील दिघोरी चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु, अशोक चौकात अतिक्रमण न काढताच बांधकाम केल्याने एका इमारती खेटून पुलाची ‘रोटरी’ झाली आहे. त्यामुळे या इमारतीच्या बाल्कनीवर उड्डाणपूल झाले आहे.
शहरातील जुन्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधून महामार्ग प्राधिकरण एनएच-३५३डी वरील ८.९ किमी लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे. भंडारा रोड, उमरेड रोड, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक आणि महाल शिवाजी पुतळ्याकडून येणारे रस्ते अशोक चौकात एकत्रित येतात. या चौकात एक विचित्र दृश्य पाहायला मिळत आहे. ते पाहून नागपूरकरांवरही थक्क होण्याची वेळ आली आहे. सध्या बांधकामाधीन असलेल्या कमाल चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाच्या रस्त्याचा रोटरी (वळण उड्डाणपूल) अशोक चौकात थेट रस्त्या लगतच्या इमारतीच्या बाल्कनीतून गेला आहे.
नागपुरात ९९८ कोटी रुपये खर्च करून इंदोरा ते दिघोरी या दोन टोकांना जोडणारा उड्डाण पूल बांधला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पूल ग्रेटनाग रोडवरील अशोक चौकातून सक्करदऱ्याकडे जातो. या चौकातून चार दिशांना उड्डाणपुलाचे रस्ते जात आहे. उड्डाणपुलाचा एका मार्गाचा रोटर रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीतून जात आहे. इमारत मालकाने अनधिकृत बांधकाम केल्याने ही स्थिती उद्भवल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ते त्यांना पाडावे लागणार आहे.
पुलाच्या बांधकामापूर्वीच ही इमारत बांधण्यात आली होती. वाढीव बांधकाम करताना त्याचा नकाशा महापालिकेकडून मंजूर करून घेण्यात आला नव्हता. त्यामुळे ज्यावेळी पुलाच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी ही बाब लक्षात आली नाही. आता पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणि केंद्रीय नितीन गडकरी यांच्या एनएचएआय खात्यावर टीका झाल्यानंतर महापालिकेने अशोक चौकातील पत्रे कुटुंबीयांच्या घराची बालकनी आज बुधवारी तोडण्यास सुरुवात केली आहे.
सक्करदराकडे जाणाऱ्या पुलाच्या मार्गाचा बाह्यभाग हा संबंधित इमारतीच्या बाल्कनीतून गेला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी मूळ रस्त्यावरून जाणारे-येणारे थांबतात. बांधकामाच्या नव्या पद्धतीबाबत चर्चा करतात. दरम्यान प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्पाचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी या पुलाचे (रोटरी) ड्रोनद्वारे काढलेले छायाचित्र दाखवत इमारत आणि पूल यादरम्यान दीड मीटरचे अंतर असल्याचे सांगितले. परंतु जमिनीवरून घेतलेल्या छायाचित्र ते अगदी भिडलेले असल्याचे दिसून येते.
वास्तविक ‘एनएचआय’ने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी महापालिकेला पत्र लिहून या चौकात अतिक्रमण असल्याचे आणि ते पुलाच्या बांधकाम अडथळा ठरू शकतो, असे कळवले होते. त्यानंतर महापालिकने संबंधित इमारत मालकास अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र, ते काढण्यात आले नाही. दरम्यानच्या काळात कंत्राटदाराने रोटरीचे बांधकाम केले, असा ‘एनएचआय’च्या एका अधिकाऱ्याचा दावा आहे.
