नागपूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट, तर दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात सर्व ११ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात मुसळधार तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या गडगडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची देखील शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार तर संभाजीनगर, बीड, हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली असून सिंदेवाही येथे सर्वाधिक १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, उर्वरित राज्यात उन्हपावसाचा खेळ सुरूच आहे. नागपूर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात ३२.८ अंश सेल्सिअस इतकी राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.
बंगालच्या उपसागरालगत ओडिशाच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली आज ओडिशामध्ये जमिनीवर येण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून दामोह, पेंद्रा रोड कमी दाबाचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे.