नागपूर : मुंबईतील माफिया राज आणि टोळीयुद्ध आता नवे राहिलेले नाही. मात्र राज्याची उपराजधानी नागपूर देखील याच पावलावर वाटचाल करीत आहे. संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गेल्या पाच वर्षांत पोलिसांनीच केलेल्या तडीपार आणि स्थानबद्धतेच्या कारवायांवर नजर टाकली तर नागपूरच्या नकाशावर संघटित माफिया गुन्हेगारांचे ठसे उमटत असल्याचे सिद्ध होत आहे. राज्याचे गृह खाते ताब्यात ठेवणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचा ‘गृह’ जिल्हा नागपूर गुन्हेगारांचे माहेरघर बनत आहे, का अशी शंका येण्या इतपत परिस्थिती आहे.

नागपूर पोलिस आयुक्तालयाने २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक असल्याचे कारण देत २७३ झोपडपट्टी दादांवर एमपीडीए कायद्यान्वये पायबंद घातला. वारंवार तंबी देऊनही हे झोपडपट्टी दादा सुधारण्यास तयार नसल्याने पोलिस आयुक्तालयाला या गुंडांना स्थानबद्ध करावे लागले. त्यामुळे सराईत गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नसल्याचेही दिसत आहे.

यातील सर्वाधिक ७२ गुंडांना २०२३ मध्ये कायद्याचा धाक दाखवावा लागला. त्या खालोखाल २०२१ मध्ये ६३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. चालू वर्षात २०२५मध्ये पोलिस आयुक्तालयाला आतापर्यंत ३५ गुंडांना या कायद्यान्वये पायबंद घालावा लागला. या सर्वांना राज्यातल्या वेगवेगळ्या मध्यवर्ती कारागृहांमध्ये स्थानबद्ध करावे लागले.

वर्षभरात तब्बल १४ टोळ्या रडारवर

महाराष्ट्र पोलिस कायदा ५५ अन्वये नागपूर पोलिस आयुक्तालयाला २०२४ या वर्षात शहरात गँग बनवून दहशत माजविणाऱ्या १४ टोळ्यांवर कारवाई करावी लागली. यात संघटित स्वरुपाची गुन्हेगारी करणाऱ्या १०५ गुंडांना पोलिसांनी कारवाईचा आसूड उगारला.

असे झाले तडीपार

वर्ष – कारवाई झालेले गुंड

  • २०२० – ४८
  • २०२१ – १०१
  • २०२२ – ९८
  • २०२३ – ३९
  • २०२४ – ७९
  • २०२५ – ३५

सर्वाधिक स्थानबद्ध अमितेश कुमार यांच्या काळात

अमितेश कुमार हे २०२१ ते २०२३ या कार्यकाळात नागपूरचे पोलीस आयुक्त होते. संघटित गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण केलेल्या अमितेश कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारीवर काही अंशी का होईना, अंकूश बसवला होता. त्यांनी नागपुरातील १६२ संघटित गुन्हेगारांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले होते.

पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय गेल्या १० वर्षांतल्या या सर्वाधिक कारवाया म्हणून नोंद झाला आहे. विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी चालू वर्षात आतापर्यंत ४० गुंडांना राज्यातल्या वेगवेगळ्या कारागृहांमध्ये स्थानबद्ध केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला प्रत्येकजण पोलीसांच्या रडारवर आहे. त्यांच्यावर गुन्हेशाखेची बारिक नजर आहे. कायदा हाती घेणारा कोणताही गुन्हेगार सुटणार नाही. सातत्याने गुन्हे करणाऱ्यांना तडिपार, स्थानबद्ध केले जात आहे. गरज पडली तर त्यांच्यावर मकोका कायद्यानुसारही कारवाई केली जाईल. – राहूल माकणीकर, पोलीस उपायुक्त, (गुन्हे अन्वेषण).