नागपूर : उपराजधानीचे शहर नागपुरात गुन्हेगारीचा विळखा घट्ट होत आहे. दिवसाढवळ्या हाणामाऱ्या, खंडणी, चाकू हल्ले, पैशांसाठी धमक्या, व्याजबट्टी, जमीनीवरचे कब्जे, त्यातून होणारे वाद, गँगवॉर रोजच्या घटना झाल्या आहेत. पोलीस आयुक्तालयानेच दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यातच शहरात ५० खून झाले. आपसांतल्या वादानंतर प्राणघातक हल्ल्याच्या ९० हून अधिक घटन घडल्या. इतक्यावरच शहरातली गुन्हेगारी थांबलेली नाही. पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात सहा महिन्यांत ३२० गुन्हेगारांकडून ३० ते ३५ बंदुका आणि तलवारी जप्त झाल्या आहेत. चालूवर्षात आतापर्यंत अपहरणाच्या २०५ घटनांची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे जे घडते, ते निमूटपणे सहन करीत खाली मान घालून दहशतीत जगणाची वेळ सामान्य माणसावर आली आहे.

अन् अवैध व्यावसायिक परतले…

दबंग पोलीस अधिकारी असा दरारा असलेले अमितेश कुमार यांनी नागपूर पोलीस आयुक्त म्हणून शहरात पाय ठेवताच, झिरो टॉलरंस मिशन राबविले. अवैध व्यावसायिकांची मानगुटी पकडत त्यांनी गुन्हेगारांना पळता भूई थोडी केली होती. त्यांच्या कार्यकाळात जुगारी, सट्टेबाज, बुकींवर सर्धाधिक कारवाया झाल्या. त्यामुळे अवैध व्यावसायिकांना शहराबाहेर पळ काढावा लागला होता. काहींनी शेजारील राज्यांमध्ये आपले बस्तान वळविले होते. मात्र अमितेश कुमार यांची बदली होताच, आनंद साजरा केलेल्या अवैध व्यावसायिकांची पावले आता पुन्हा शहराकडे वळली आहेत. त्यामुळे नव्याने सट्टेबाज, बुकींना रान मोकळे झाले आहे.

शांतीनगरात ‘बावाजी’चा दबदबा

शांतीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेला परिसर आहे. इतवारी, मस्कासाथ, दहिबाजार , कळमना , लकडगंज सारख्या व्यापारीपेठा जवळ असल्याने शांतीनगर कायम वाहते असते. या भागातले सटोरी आणि व्यापाऱ्यांचा शांतीनगरातल्या जुगार अड्यांवरचा वावर वाढला आहे. हा जुगारी परिसरात अशोक बावाजी नावाने परिचित आहे. त्याचा या भागात दबदबा आहे. यथील एका राजकीय नेत्याचा त्याच्यावर वरदहस्त असल्याने पोलीस अशोक बावाजीच्या जुगार अड्यात हात घालायला धजावत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे बावाजी हा राजरोसपणे जुगार अड्डा चालवत आहे.

गिट्टीखदानमध्ये ‘गुही ‘ची चलती…

दाट लोकवस्तीचा भाग म्हणून परिचित गिट्टीखदान गुन्हेगारांच्या केंद्रबिंदूपैकी एक आहे. हे पोलिस ठाणे पाचपावली, गणेशपेठ, तहसिल, इंदोरा, जरिपटका, कामठी, हुडकेश्वर या अशांत ठाण्यांपैकी एक आहे. गिट्टीखदानमध्ये हाणामाऱ्या, जीवघेणे हल्ले, धमक्या, वसुली सारख्या घटना रोजच्या आहेत. गोरेवाडाच्या सिमेवरील या हा भाग गुन्हेगारी घटनांमुळे कायम धगधगत असतो. या भागात गणेश गुहीच्या जुगार अड्ड्याची सध्या चलती आहे. तीन पत्ती, सट्टापट्टी, मटकाच्या आकड्यांवर सर्रास देवाण- घेवाण होते. त्याची सगळी कुंडली ठावूक असतानाही पोलीस त्याची कॉलर धरायला तयार नाहीत.

हिंगणात भुऱ्याचे जाळे

हिंगणा परिसरात मोठ्या प्रमाणात मजूर, कष्टकरी वर्गाच्या वस्त्या आहेत. शिवाय याच भागात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी, व्यवस्थापन, खासगी वैद्यकीय महाविद्यालये एकवटली आहेत. औद्योगिक वसाहत आणि शिक्षणाचे केंद्र झालेल्या या भागात परराज्यातल्या कष्टकरींची संख्या मोठी आहे. शेजारिल राज्यांमधून तडीपार झालेले गुंड या आयसीचौक, राजीवनगर, वानाडोंगरीतल्या वसाहतींमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे याभागतही सट्टा, जुगार अड्डे बोळाकळे आहेत. भोऱ्या या गुंडाच्या नेतृत्वाखाली याच परिसरात चार मीत्र मिळून चालवला जात असलेला अड्डाही कुप्रसिद्ध आहे.

तरुण व्यसनांच्या आहारी

ऑनलाइन बेटिंग, सट्ट्यातून कमावलेला झटपट पैसा जुगारींना स्वस्थ बसू देत नाही. जुगारात कमावेल्या पैशातून पावले व्यसनांकडे वळत आहेत. तर गमावलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी चोरी, खून, लुट आणि घरफोड्या वाढत आहेत. शहराच्या सभोवताल राजरोस सुरू असलेल्या जुगार अड्यांची कुंडली पोलीसांना ठावूक आहे. मात्र तरीही पोलीस प्रशासनाला ते दिसत नाही, की राजकीय दबाव आणि वरदहस्तामुळे पोलिसांना त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पहायचे नाही, हा सवाल उपस्थित होत आहे. त्यांना नेमके कोणाचे अभय आहे, हे न उलगडणारे कोडे बनत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराच्या हद्दीला लागून असलेल्या भागांत अवैध व्यावयायिकांच्या मुसक्या बांधण्यासाठी अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित पोलीस ठाणे प्रमुख आणि गुन्हे युनिट प्रमुखांवर याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याचे आदेशही संबंधितांना दिले आहेत. – राहूल माकणीकर, पोलिस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण