नागपूर : जंगलालगतच्या गावातील गावकऱ्यांना नेहमीच वाघ, बिबट्यांचा सामना करावा लागतो. त्यांची पाळीव जनावरे नेहमीच वाघ, बिबट्याच्या तावडीत सापडतात. मात्र, एका बिबट्याने चक्क एका आमदाराच्याच गोरक्षणातील वासरांचा फडशा पाडायला सुरुवात केली. शेवटी आमदाराने वनखात्याकडे तक्रार केली आणि मग वनखात्याला याची दखल घ्यावीच लागली. शेवटी दोन दिवसानंतर ते बिबट जेरबंद झाले आणि आमदाराने सुटकेचा श्वास सोडला.
वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. याच मार्गावर नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हिंगण्याच्या समोर मोहगाव झिलपी हे निसर्गरम्य स्थळ आहे. मोठा तलाव असल्यामुळे पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. काही वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर व आता आमदार असलेले संदीप जोशी यांनी तलावाच्या काठावर भव्यदिव्य असे सिद्धिविनायक गणेशाचे मंदिर बांधले. याच ठिकाणी त्यांचे गोरक्षण देखील आहे आणि त्यात असंख्य गायींची वासरे आहेत. हा बोर व्याघ्रप्रकल्पालगतचा परिसर असल्याने याठिकाणी नेहमीच बिबट्याचा वावर असतो. अशातच या बिबट्यांची नजर आमदाराच्या या गोरक्षणातील वासरांवर पडली.
हळूहळू त्या बिबट्याने गोरक्षणातून दररोज एक, दोन अशी वासरे उचलून न्यायला सुरुवात केली. या वासरांनाच त्याने आपले भक्ष्य बनवले. आमदाराच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी वनखात्याकडे तक्रार केली. वनखात्याने त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावला, त्यातदेखील बिबट वासरू उचलून नेतानाचे दृश्य कैद झाले. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमूने याठिकाणी पिंजरा लावला. त्या पिंजऱ्यात त्यांनी बकरी बांधली आणि आमदाराला गोरक्षणातील गाईंची सर्व वासरे इतरत्र हलविण्यास सांगितले. ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या या डावपेचात बिबट बरोबर अडकला. गाईची वासरे तर नव्हती, पण बकरीच्या मोहात तो पिंजऱ्यात अडकला आणि आमदाराने सुटकेचा श्वास सोडला.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही कामगिरी पार पाडली गेली. त्याच दिवशी या बिबट्याला दूर जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर व हिंगणा वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी यात फार मोलाचे सहकार्य केले. कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र राज्य व शीतल कर्नासे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगणा यांच्या नेतृत्वात पूर्ण कारवाई करण्यात आली.
डॉ. विनिता व्यास, उपवनसंरक्षक नागपूर वन विभाग व श्री यश काळे सहाय्यक वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडून निसर्गमुक्त करण्यात आले. यात ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, प्रशांत कोल्हे, वनपाल, प्रतीक घाटे, वनरक्षक, सिद्धांत मोरे, प्रवीण मानकर, पशु पर्यवेषक व बंडू मंगर, विलास मंगर, चेतन बारस्कर, स्वप्नील भुरे, आशिष महल्ले यांनी महत्वाची भूमिका बजावली.