नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथून मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचे साहित्य व कामगारांना घेऊन परतणारा ट्रक शुक्रवारी दुपारी भिवापूरजवळील मारू नदी परिसरातील वळणावर उलटला. त्यात आठ जण जखमी झाले. सर्वांना नागपुरातील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
‘गोष्ट सुरू होती’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे कामगार आलापल्ली येथे गेले होते. नागपूरकडे येत असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच भिवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल इतर सहकारी व होमगार्डसह घटनास्थळी पोहचले. त्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते. जखमींना तातडीने स्थानिक शासकीय रुग्णालय व येथून प्राथमिक उपचारानंतर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात हलवले गेले.
चालकाने दिलेल्या माहिनुसार, पुलाच्या तीव्र वळणावर त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक उलटला. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मारू नदीच्या पुलाजवळ या महिन्यातली ही तिसरी दुर्घटना आहे. भिवापूर पोलिसांनी या पुलाला अपघातप्रवण ठिकाण म्हणून आधीच चिन्हांकित केले आहे. पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) पुलाच्या तुटलेल्या रेलिंगची दुरुस्ती करण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतरही दुरूस्ती झाली नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
जखमी कामगारांची नावे काय ?
जखमी कामगारांमध्ये गोविंद रामजी रघुटे (३५), आकाश मनोज यादव (२७), जावेद शेखरमाजन मन्सुरी (२९), हरीश कुवेरगन माहेर (३४), बसंत रामसिंग देहरिया (४७) आणि इतर सर्व रहिवासी छिंदवाडा, अभिषेक शिवप्रसाद यादव (२२) रा. सिवनी, मध्यप्रदेश, अनुप कुमार राजेंद्र प्रसाद महंतो (३८) रा. बिहार आणि आनंद देवबंद रॉय (३५) रा. विरार, मुंबई यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह…
पोलिसांकडून सदर राष्ट्रीय महामार्गावर अपघात होत असून त्याची कारणे कळवली गेली होती. सोबत दुरूस्तीची विनंतीही केली गेली होती. त्यानंतरही या रस्त्यावरील दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले गेले. येथे अपघाताची मालीका सुरू असतांनाही होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित जाला आहे. दरम्यान येथे कुणाचा जीव जाण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचआय) आहे काय? हा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. या विषयावर एनएचआयच्या अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.