नागपूर : भरकटलेल्या स्थितीत स्थानकावर आलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक काम महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी केल्याने त्यांचे कौतूक होत आहे. १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता, १४ वर्षाचा एक मुलगा न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आला. तो गोंधळलेला होता. मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तो सहकार्य करीत नव्हता.

मात्र, त्याच्या शालेय बॅगेवरील स्टिकर्सवरून काही माहिती मिळाली. स्थानक नियंत्रक मयूर कोरडे यांनी त्याच्या शाळेशी संपर्क साधून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला. नंतर समजले की तो मुलगा गेल्या दोन दिवसांपासून हरवलेला होता. जरीपटका पोलिसांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता त्याला कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले.

याच दिवशी, मेट्रोच्या नागपूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने सैरभैर झालेला १४ वर्षांचा एक मुलगा पाहिला, त्यांना वेगळीच शंका आली आणि त्यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांना माहिती दिली. वेळ न दवडता मेट्रो कर्मचाऱ्यांनी हालचाली केल्या. त्या मुलाशी संवाद साधला. त्यातून कळले की तो गोंदियामधून घर सोडून पळून आला आहे. ५ दिवसांपासून भटकत होता. या संदर्भात गोंदिया पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मेट्रो सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून, गोंदिया पोलिसांशी समन्वय साधला आणि या मुलाला सुखरूप कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले.

यापूर्वीच्या देखील काही घटना

  • २३ मार्च २०२५ रोजी, सिताबर्डी मेट्रो स्टेशन तिकीट काउंटरवर एक १४ वर्षांची किशोरवयीन मुलगी निदर्शनात आली होती. ती गी सेलू (वर्धा) येथील असून, आईसोबत झालेल्या वादानंतर ती घर सोडून आली होती. मेट्रो प्रशासनाने वर्धा पोलिसांशी संपर्क साधून तिला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केलं.
  • १२ एप्रिल २०२५ रोजी, दोसर वैश्य चौक मेट्रो स्थानकावर १४ वर्षांचा मुलगा तिकीट घेण्यासाठी आला. त्याला केवळ बंगाली भाषा येत असल्यामुळे त्याची भाषा कळत नव्हती.चौकशी केल्यावर समजले की तो हुगळी जिल्ह्यातील (प. बंगाल) महिपालपूरचा रहिवासी असून, त्याचा संपर्क घरच्यांशी तुटलेला होता. त्यालाही मेट्रो प्रशासनाच्या मदतीने कुटुंबियांसोबत पुन्हा भेट घालून देण्यात आली.