नागपूर : जात धर्म पाहून प्रेम होत नसते. असेच काहीसे एका मुस्लिम प्रेमी युगुलांचे आहे. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. धार्मिक रितीरिवाजानुसार आम्ही निकाह केला आहे. मात्र कुटुंबाच्या विरोधामुळे जीवाला धोका निर्माण झाल्याची कैफियत मांडत हे मुस्लिम प्रेमियुगुल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात आश्रयाला आले आहेत. आम्ही सज्ञान आहोत. संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. आमची कोणाविरोधातही तक्रार नाही पण आम्हाला सुरक्षित संसार करू द्या, अशी आर्जव करीत त्यांनी गृहमंत्र्यांकडे जीवाची हमी मागितली आहे.
प्रेमाला असलेला विरोध आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण झालेले हे प्रेमियुगुल आहे, राहील शेख आणि रबा महेरोश. वयाचे २२ वर्षे ओलांडलेली रबा कर्नाटकातल्या बिदरची तर २६ वर्षांचा राहिल महाराष्ट्रातल्या परभणीतला रहिवासी. या दोघांची ४ वर्षांपूर्वी समाजमाध्यमांवरून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर अल्पावधीतच प्रेमात झाले. एकमेकांसोबत जगण्या मरण्याच्या आणाभाकाही झाल्या. पण मुलीच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते. त्यांनी रबाचा निकाह दोन मुलांचा बाप असलेल्या एका वृद्धासोबत ठरविला. याची कुणकूण लागताच रबा २ जुलैला घरातून पळाली आणि नांदेड मार्गे परभणीत राहिल जवळ पोचली. तोवर रबाच्या कुटुंबियांनी राहिलला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदलेले हे प्रेमियुगल दोन दिवसांपूर्वी नागपुरात धडकले आणि ते निकाह करून मोकळे झाले. मुस्लिम धर्मिय असलेल्या प्रेमियुगुलाने कामठी मार्गावरील मदिना मदरसा येथे निकाह केला आहे.
जीवाला धोका निर्माण झाल्याने या दोघांनीही मंगळवारी पत्रकारांशी साधलेल्या संवादात आपली कैफियत मांडली. रबा म्हणाली, आमचे एकमेकांवर प्रेम आहे का कोणता गुन्हा आहे का. आम्ही दोघेही सज्ञान आहोत. आमची संविधानावर श्रद्धा आहे. कुटुंबाचा विरोध मावळावा यासाठी आम्ही खुप प्रयत्न केले. मात्र ते एकायला तयार नाहीत. सावत्र आहे, सख्खे भाऊ आणि वडिल आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्याला दुजोरा देताना राहिल म्हणाला, अर्धांगवायूचा झटका आल्याने खाटेला खिळलेले माझे वडील देखील जीवाच्या भितीने परभणी सोडून गेले आहेत. आमचे चार जणांचे कुटुंब माझ्या नोकरीवर जगते. मात्र जीवाच्या भितीने आम्हाला अनोळखी नागपुरात शरण मागावी लागत आहे. म्हणूनच आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाला आलो आहोत. आम्हाला एकमेकांसोबत जगायचे आहे. आमची कुणाविषयी देखील तक्रार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जीवाची हमी द्यावी, इतकेच आमचे म्हणणे आहे.