नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग, पूल, उड्डाणपूल बांधणीत योग्य तंत्रज्ञान वापरून कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील राष्ट्रीय महामार्ग त्यामुळे सर्वाधिक चर्चत आहे. मात्र अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि महामार्ग खचण्याचे, पुलास तडे जाण्याचे प्रकार घडल्याने या खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजी करून पाच महिन्यानंतर मे महिन्यात बुटीबोरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, आता एक नवीनच समस्या समोर आली आहे. या पुलाच्या दोन गर्डरमध्ये मोठी फट निर्माण झाली आहे. ती वाढवून वाहनांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलात मोठी फट दिसून येत आहे. यासंदर्भातील चित्रफीत प्रसारित झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये या पुलास तडे गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुरुस्तीनंतर दोन महिने होत नाहीतर आता फट निर्माण झाली आहे. बुटीबोरी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ तसेच हैदराबादकडे जाणाऱ्यांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे.

नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाण पुलास तडे गेले होते. त्यामुळे डिसेंबर २०२४ पासून हा उड्डाणूपूल बंद करण्यात करण्यात आला होता. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराने सादर केलेल्या लोड टेस्टिंग अहवालाची तपासणी केली आहे आणि उड्डाणपूल पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. बुटीबोरी उड्डाणपूल पुन्हा सुरू केल्याने स्थानिकांसाठी मोठी समस्या बनलेल्या वाहतुकीच्या अडचणी दूर झाली आहे. बुटीबोरी चौकात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ तसेच हैदराबादकडे जाणाऱ्यांना अडकून पडावे लागत होते. त्यामुळे लवकरात लवकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होती. नागपूर ग्रामीण पोलिसांनी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक वळवण्याचा मार्ग शोधून काढला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा २५ मे रोजी नागपूर दौरा होता. यापूर्वी दुरुस्त झालेले उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण आता दोन गर्डरमध्ये मोठी फट दिसू लागली आहे. बुटीबोरी चौक येथे उभे राहून उड्डाणपुलावरून कोणती वाहने जात आहेत, हे दिसत आहे. काहींनी त्याचे व्हिडिओ काढून वायरल केले आहे.या उड्डाण पुलास २४ डिसेंबर २०२४ रोजी भेगा आढळल्यानंतर, बुटीबोरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी उड्डाणपूलावरून वाहन जाऊ नये म्हणून दोन्ही टोकांवर बॅरिकेड्स लावले होते.

दरम्यान, एनएचएआयने व्हीएनआयटी तज्ञ आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या पथकाला तडे जाण्यामागील कारणांचा अभ्यास करण्यासाठी आणि उड्डाणपूल दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी बोलावले होते. व्हीएनआयटी पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि नमुने घेतले आणि त्यांचा अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष एनएचएआयला सादर केले. उड्डाणपूल दोषपूर्ण जबाबदारीखाली असल्याने, कंत्राटदाराला दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आले.

या पुलाची तत्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाल दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये पुलाचे खांब मजबूत करण्यासाठी अतिरिक्त बार जोडण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामुळे उड्डाणपुलाची भार सहन करण्याची क्षमता आता वाढली आहे याची खात्री झाली आहे. त्यामुळे भविष्यात उड्डाण पुलाचे खांबांला तडे जाण्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. स्थानिक अधिकाऱ्यांना लोड टेस्टिंगचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.