नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात. नागपूरमधील एका समारंभात ते म्हणाले, जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यावर गडकरींचे या वाक्याची सर्वत्र चर्चा होती.

गडकरींचा आता मोदींच्या जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे का?, असाही प्रश्न जनमानसात उपस्थित केला जात होता. मात्र, नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जो कोणी जातीबद्दल बोलेल, हे विधान केले आहे. त्यामुळे गडकरींचा जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे का?, मोदींच्या या निर्णयाचा ते खरचं विरोध करतात का?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. गडकरी नेमके काय म्हणाले? ते पाहूया…

केंद्र सरकारने जातींच्या गणनेसह लोकसंख्येची मोजणी म्हणजेच ‘जातनिहाय जनगणना’ करण्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. येत्या २०२७ साली ही जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.

राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटना असलेल्या विवेक विचार मंचाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. गडकरी म्हणाले, कोणतीही व्यक्ती जात-पात, धर्माने मोठी नसते, तर तिच्या गुणांनी मोठी होत असते. आपल्याला समाजातील आर्थिक, सामाजिक विषमता दूर करून जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण करायचा आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित समाजातील असूनही इतक्या मोठ्या पदावर गेले. प्रत्येकामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेच्या आधारावर व्यक्ती मोठा व्हावा हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते, असेही गडकरी म्हणाले. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजासाठी जीवन समर्पित केले. सामाजिक न्यायाच्या आधारावर हा समाज सुखी झाला पाहिजे, असे बाबासाहेब म्हणायचे. त्यांच्या संघर्षाचा काळ लक्षात घेतला तर त्यावेळी उपासमारी, गरिबी, अत्याचार, अन्याय मोठ्या प्रमाणात होते. अश्या परिस्थितीत त्यांनी दलित, शोषित, पीडित समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी कधीही जात, धर्म, पंथ मानत नाही. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे नियमात असेल तर काम करतो. मात्र, ज्यानी कोणी जातीचा विषय काढला तर त्याला सोडत नाही. जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारेन, असे गडकरी म्हणाले. त्यांच्या या वाक्यामुळे पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.