नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन प्रमुख नेते आणि राजकीय विरोधक असलेले खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पक्षांतर्गत मतभेद विसरून आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र दिसण्याची चिन्हं दिसत आहेत.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे संकेत दिले असून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील सहभागी होण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संविधान चौक, नागपूर ते चंद्रपूर महामार्ग, तसेच यशवंत स्टेडियम आणि संविधान चौक येथे त्यांचे ओबीसींच्या हक्कासाठी लावण्यात आलेले फलक लक्षवेधी ठरत आहेत.

राजकीय मतभेद असूनही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघे नेते एकत्र येत असल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी काँग्रेसमध्ये एकजूट होत असल्याचे हे उदाहरण मानले जात आहे.

हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेंबर रोजी शासनाने जारी केलेला जीआर (शासन निर्णय) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी आज नागपुरात ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकापर्यंत जाणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

मोर्चासाठी यशवंत स्टेडियम आणि संविधान चौकात व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. स्टेजवर “२ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा” आणि “ओबीसी आरक्षणाचा हक्क – ओबीसी आरक्षण बचाव” असे फलक झळकावण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांचा ठाम आग्रह आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून, तो ओबीसी समाजाच्या हक्कांवर घाला आहे.

या मोर्चाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, समन्वय समितीचे सदस्य उमेश कोराम आणि काँग्रेस नेते रवींद्र दरेकर यांनी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजचा मोर्चा हा एक ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे.” यावरून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, “सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर हा ओबीसी समाजाच्या मुळावर घाव आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जात आहेत. त्यामुळे तो जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे.”

या आंदोलनाला राजकीय पाठबळ देखील मिळाले असून, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी देखील जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, “मी स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहे. हा लढा फक्त आरक्षणाचा नाही, तर न्यायाचा आहे.”

ओबीसी समाजाकडून असा इशारा देण्यात येतोय की जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर यापुढे लढा अधिक उग्र आणि व्यापक स्वरूप घेईल. आजचा मोर्चा म्हणजे केवळ सुरुवात आहे, हे स्पष्ट संकेत आहेत.