नागपूर: नागपुरात अनेक हुक्का पार्लर नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. शंकरनगर परिसरात निंबस हुक्का पार्लरवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. येथे उच्चभ्रू कुटुंबातील तरुणींना हुक्का घेतांना बघून पोलिसही थक्क झाले. पोलिसांकडून या हुक्का पार्लरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर शहर पोलिसांकडून ऑपरेशन थंडरच्या नावावर मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर व्यवसयाविरूध्द कारवाई केली जात आहे. सोमवारी रात्री शंकरनगर येथील निंबस लाउंज हुक्का पार्लरवरही पोलिसांनी छापा टाकला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत, अंबाझरी पोलिस ठाण्यात हुक्का पार्लर ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या छाप्यादरम्यान, उच्चभ्रू कुटुंबातील मुलींनाही पोलिसांनी धूम्रपान करताना पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा छापा पहाटे तीन वाजता टाकण्यात आला, खरे तर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की हे पार्लर रात्रभर बेकायदेशीरपणे चालवले जात आहे. उच्चभ्रू कुटुंबातील मुली आणि गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले तरुण येथे जमतात अशीही टिप होती. पोलिसांनी छापा टाकला यावेळी हुक्का पार्लरचा दरवाजा आतून बंद होता, परंतु आतील दृश्य धक्कादायक होते. संपूर्ण हुक्का पार्लर ग्राहकांनी भरलेले होते आणि त्यांना वेगवेगळ्या चवीचे तंबाखू असलेले हुक्का वेटरतर्फे पुरवले जात होते.
पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती तेथील तरुणींसह इतरांना कळताच गोंधळ उडाला. अचानक सर्व पळण्याचा प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. परंतु पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या ग्राहकांना कडक कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर गोंधळ कमी झाला. दरम्यान पोलिसांनी येथे हुक्का पार्लर चालक समीर शेखवर याच्यावर गुन्हा दाखल केला.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका हुक्का पार्लर ऑपरेटरची पूर्व वैमनस्यातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यामुळे पोलीस अशा हुक्का पार्लरवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सहाय्यक उपायुक्त सुनीता मेश्राम, वरिष्ठ निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली ही छापा टाकण्यात आला. भविष्यातही ही पोलिस मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान येथील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला गेला असला तरी शहरातील विविध भागातीलही हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई होणार काय? याकडे सगळ्या नागपुरकरांचे लक्ष लागले आहे.