नागपूर : डिजिटल अरेस्टची भिती दाखवत नागपूरकर व्यापाऱ्याला २४ लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणात गुरुवारी नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेला यश आले. ओडीशाती भुवनेश्वर पोलिसांच्या मदतीने सायबर शाखेने एकाला अटक करीत त्याचे बनावट बँक खाते गोठवले. त्यामुळे फसवणूकीला बळी पडलेल्या नागपूरकराचे १९ लाख रुपये परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. डिजिटल अरेस्ट सायबर गुन्हेगारी प्रकरणात सायबर शाखेला आलेले हे मोठे यश मानले जात आहे.
या प्रकरणात विशेष म्हणजे या गुन्ह्यातील १९ लाख ९० हजार रुपये फिर्यादीस परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आपल्याला २ जुलैला सकाळी ११ टेलिकॉम विभाग दिल्ली, मुंबई पोलीस, सुप्रीम कोर्ट अशा विविध सरकारी संस्थांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून धमकावण्यात आल्याच्या आशयाची तक्रार फिर्यादीने १५ जुलैला सायबर पोलिसांकडे केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचे नाव असून डिजिटल अरेस्ट केले जात आहे, अशी भीती दाखवून बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात आपल्याला २३ लाख ७१ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले होते.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायबर पोलिसांनी भुवनेश्वर पोलिसांशी संपर्क साधून ५ ऑगस्टला रंजनकुमारला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान त्याचे खाते गोठवून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यातले १९ लाख ९० हजार रुपये तक्रारदाराला परत केले जाणार आहेत. सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपआयुक्त लोहीत मतानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे, विनोद तोंडफोडे, रिंकेश ठाकूर यांनी या मनी लॉंड्रिंग प्रकरणात अचूक कारवाई केल्याने फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकाला दिलासा मिळाला आहे.
खात्याशी लिंक आधार आणि फोनने लावला छडा
त्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत फसवणुकीसाठी वापरलेले बँक ऑफ महाराष्ट्रच्या ओडिशातील पुरी शाखेतील खाते क्रमांक शोधले. या क्रमांकाचे खाते हाताळणारा रंजनकुमार विष्णुचरण पटनाईक (वय ६०, रा. नाऊगाव, ओडिशा) याचा बँकेच्या पत्त्यावर शोध घेतला असता तो सापडला नाही. संबंधित खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही बंद होता. तरीही त्याच्यावर वॉच ठेवत पोलिसांनी सायबर गुन्हेगाराला शोधून काढले.