नागपूर : सोळाशेच्या जवळपास बसेस रोज नागपूर शहरात शिरत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, अशी धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पोलीस भवनात सोमवारी घेतलेल्या बैठकीत पुढे आली.

बैठकीला नागपूर महापालिका, एनआयटी, महसूल, आरटीओ, टाऊन प्लॅनिंग, वाहतूक शाखा, नागरिक, ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक, सामाजिक संस्था, सोशल मीडिया इनफ्लुएन्सर्स, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक इत्यादी विविध स्तरातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपायुक्त चांडक म्हणाले, शहरात खाजगी बसमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी, अनधिकृत थांबे, अपघात, नागरिकांचा रोष इत्यादी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ट्रॅव्हल्सच्या समस्यांवर केवळ दंडात्मक कारवाईने उपाय शक्य नाही. एकत्रित चर्चेद्वारे ठोस धोरण गरजेचे आहे.

शहरातील बैद्यनाथ चौक, जाधव चौक, गीतांजली टॉकिज चौक, सीए रोड, तुकडोजी पुतळा, म्हाडा कॉम्प्लेक्स, छत्रपती नगर, वर्धा रोड, मानस चौक, बोले पेट्रोल पंप चौक, यशवंत स्टेडियम या प्रमुख ठिकाणी खाजगी बसेसमुळे होणाऱ्या अडथळ्यांचे निरीक्षण केले गेले. त्यानंतर २४ तासांच्या आत शहरातील सहा एक्झिट पॉईंटवर १०० वाहतूक पोलिसांद्वारे नाकाबंदी राबवली गेली. त्यात १६०६ खासगी ट्रॅव्हल्स बसेस शहरात आल्या- गेल्याची नोंद आहे. या बसेस शहरातील प्रमुख ठिकाणी शिरून वाहनाची लांबी आणि टर्निंग सर्कलमुळे वाहतूक ठप्प होते व अपघात घडत असल्याचेही यावेळी पुढे आले.

आरटीओ व महापालिका अधिकारी काय म्हणतात?

नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण म्हणाले, शहरात ८ हजार खासगी बसेस आहेत. त्यांच्या पार्किंग प्लेस, पिकअप-ड्रॉप झोनसाठी नियोजन आवश्यक आहे. आगामी काळात आणखी मल्टी-एक्सल बसेस येणार असल्याने नियोजनात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिकेकडून शटल सेवा, शहराबाहेर पार्किंग व्यवस्था व आवश्यक त्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली. याप्रसंगी नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या चालकांचे उद्धट वर्तन, अनधिकृत पार्किंग व एजंटांचे अतिक्रमण, ओव्हरलोडिंग, अवैध पार्सल वाहतूक, बसस्थानकांवर होणारे अतिक्रमण, ध्वनिप्रदूषण (प्रेशर हॉर्नचा वापर), वाहतुकीतील अडथळे व नियमबाह्य बस थांब्यांचा प्रश्न मांडला.

ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणने काय?

बस मालक व ट्रॅव्हल्स संघटनेने सांगितले की, शहरात बस स्टँड नसल्याने अडचणी असल्याचे नमूद केले. ९० टक्के ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था असून, प्रशासनाने अधिकृत ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास नियमांचे पालन करण्यात आम्ही सहकार्य करू, असेही संघटनेने दावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा कुणाला?

शहरातील अपघातांचे प्रमाण सहा महिन्यांत २५ टक्क्यांनी कमी झाले आहे. हे आणखी खाली आणण्यासाठी येथील वाहतूक शिस्तबद्ध करणे, आधुनिक तंत्रज्ञान (सीसीटीव्ही, एआय) वापरणे, शटल सेवा, जागरूकता व समन्वयात्मक नियोजन अत्यावश्यक आहे. शहरात आता प्रेशर हॉर्न वापरावर कठोर कारवाई केली जाईल. समस्यांचे निराकरणासाठी नियमांचे पालन गरजेचे आहे. ते नसल्यास कारवाई केली जाईल. विशेष समिती स्थापन करून व्यापक धोरण राबवले जाईल, असे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल म्हणाले.