नागपूर : प्रवाशांचा अनुभव समृद्ध करणाऱ्या आणि वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमांतर्गत, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत ‘रेल लायब्ररी’चे उद्घाटन नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आले. प्रत्येक ‘पानामध्ये एक प्रवास’ ही या उपक्रमाची प्रेरणादायी टॅगलाईन आहे, ज्याचा उद्देश प्रवाशांना त्यांचा वेळ ज्ञान आणि आनंदाने व्यतीत करण्याची संधी देणे आहे.
ही लायब्ररी ‘एक पुस्तक घ्या, एक पुस्तक द्या’ या तत्वावर कार्य करते.
प्रवासी या लायब्ररीमधून पुस्तके उचलू शकतात आणि इच्छेनुसार स्वतःची पुस्तके देखील दान करू शकतात. ही स्वयंसेवी कल्पना ज्ञान-संवादाला चालना देते आणि प्रवासात साहित्यिक वातावरण निर्माण करते. स्थानकाच्या आवारात वसलेली ही लायब्ररी सर्व प्रवाशांसाठी खुली व विनामूल्य आहे. कथा, आत्मचरित्र, प्रेरणादायक पुस्तके, बालवाङ्मय आदींचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांनी भरलेली ही लायब्ररी सर्व वयोगटांतील वाचकांसाठी उपयुक्त आहे.
या उपक्रमामार्फत मध्य रेल्वे, नागपूर विभाग प्रवाशांना “वाचा, विचार करा, मोठे व्हा – हाच खरा प्रवास” असे सांगत आहे आणि वाचन संस्कृतीचा प्रचार करत आहे.दरम्यान, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी चालवलेले ग्रंथालय आहे. विस्तीर्ण ग्रंथालय, हजारो पुस्तके, मासिके, वाचकांची उत्तम संख्या हे या ग्रंथायलाचे वैशिष्ट्य आहे.सीएसटी येथील रेल्वे मुख्यालयात तळमजल्यावर हे विस्तीर्ण ग्रंथालय आहे. रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या या ग्रंथालयाचे सुमारे १६०० सदस्य आहेत. कित्येक वर्षांपासून रेल्वे कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी हे ग्रंथालय वाचनानंदाचा खजिना ठरला आहे. या ग्रंथालयात सुमारे ५,५०० मराठी पुस्तके असून साधारण ४ हजारांवर इंग्रजी पुस्तके आहेत. त्यासह, मराठी आणि इंग्रजीतील २५० मासिके इथे येतात. दोन्ही भाषेतील प्रमुख नियतकालिके, मासिके इथे उपलब्ध असतात.
या ग्रंथालयात दररोज सुमारे १२०हून अधिक सदस्य पुस्तके घेतात. त्यात, मराठी आणि इंग्रजीतील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या साहित्यकृतींचा आवर्जून समावेश असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, दुर्गा भागवत ते शेक्सपीअर अशा लेखकांच्या सर्व साहित्यकृती इथे वाचायला मिळतात. वाचकांनी सुचवलेल्या नवीन पुस्तकांचाही समावेश करण्याची येथे पद्धत आहे. हिंदी भाषेतील साहित्यासाठी जवळच्या ॲनेक्स इमारतीत स्वतंत्र ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाचा उपयोग अनेक वर्षांपासून करत आहे. मुलांपासून मोठ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असे विविध प्रकारचे साहित्य इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे