नागपूर : नागपूरकरांसाठी आणि विदर्भातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर रेल्वे स्थानक आता पूर्णपणे बदलणार असून, येथे ‘एअरपोर्ट स्टाईल’ छतपूल (Elevated Concourse) उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना आधुनिक व सुविधायुक्त रेल्वे स्थानकाचा अनुभव मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हा उन्नत छत पूल ५,६१६ चौ. मीटर क्षेत्रफळात, तब्बल १०८ मीटर रुंद आणि ५२ मीटर लांब असणार आहे. छत पूल प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ ते ६/७ पर्यंत पसरलेला असेल आणि पूर्व तसेच पश्चिम दोन्ही प्रवेशद्वारांमधून त्याचा सहज वापर करता येईल.
सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ चे बांधकाम सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हे उन्नत छत पूल उभारण्यात येत आहे. राणी कमलापती (भोपाल) आणि गांधीनगर (गुजरात) स्थानकांच्या धर्तीवर नागपूर स्थानकाला वर्ल्ड-क्लास ट्रॅव्हल हब बनवण्याचे उद्दिष्ट आहे. हे छत फक्त प्रवास मार्ग नसून, यामध्ये फूड कोर्ट, दुकाने, स्वच्छतागृहं आणि आरामदायक वेटिंग एरिया देखील असणार आहेत. प्रवासी येथे बसून आपल्या गाडीची प्रतीक्षा करू शकतील, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होणार आहे. एस्कलेटर, लिफ्ट आणि सोपानमार्गांच्या साहाय्याने प्रवाशांना सर्व प्लॅटफॉर्म्सना सहज प्रवेश मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म क्रमांक ८ देखील या उन्नत पूलाशी जोडला जाणार आहे.
या नव्या डिझाइनमुळे नागपूर रेल्वे स्थानक केवळ एक प्रवास केंद्र न राहता, एक आधुनिक आणि कार्यक्षम ट्रान्झिट पॉइंट बनणार आहे. नागपूरकरांसाठी ही योजना निश्चितच अभिमानास्पद ठरणार आहे आणि शहराच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.