नागपूर : अंग भाजणाऱ्या उन्हाचा जनजीवनावर परिणाम झाला असून दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. यातच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि अल्पदाबामुळे होणाऱ्या पाणी पुरवठय़ामुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पारा ४५ अंश पार गेला. रविवारी नागपुरात ४५.१ अंश सेल्सीयस तापमााची नोंद करण्यात आली.

सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडणे नागरिक टाळू लागले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत वातावरणात उष्मा जाणवतो. दुपारी रस्त्यावरची वर्दळही कमी होते. एकीकडे तापमान वाढत असतानाच दुसरीकडे ऐन दुपारी विजेचा लंपडाव सुरू होतो.

थोडय़ावेळासाठी का होईना पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही वर्धा मार्गावरील चिंचभवनसह परिसरातील वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यातच नागपुरातील काही भागात अल्पदाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागिरकांकडून टिल्लू पंपाचा वापर केला जात असल्याने इतरांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीतही वाढ होऊ लागली आहे.

महापालिकेने उष्माघात प्रतिबंधक आराखडा तयार केला असला तरी दुपारी सिग्नल बंद करण्यापलिकडे इतर बाबींवर अंलबजावणी होताना दिसून येत नाही.

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. उन्हात दुचाकीवर जाण्याऐवजी नागरिक मेट्रोला पसंती देत असल्याने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये  सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

विदर्भातील तापमान

विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर (४६.८) येथे करण्यात आली. त्या खालोखाल वर्धा (४५.६) ब्रम्हपुरी (४५.९), अमरावती (४५), यवतमाळ (४४.५), गोंदिया (४४.५) आणि बुलढाणा (४१.३) येथे तापमानाची नोंद करण्यात आली.

अंबाझरी, फुटाळय़ावर गर्दी

शनिवारी, रविवारी अंबाझरी, फटाळा तलावावर नागपूरकरांची गर्दी वाढू लागली आहे. दिवसभर उन्हामुळे बाहेर पडू न शकणारे या तलावांवर गर्दी करतात.