नागपूर : शहरांमध्ये ज्येष्ठांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांना आवर घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आले आहे. अशाप्रकारच्या सर्वाधिक घटना नागपुरात घडल्या आहेत.

एनसीआरबीच्या नोंदीनुसार, २०२३ मध्ये देशात ज्येष्ठांवरील अत्याचाराचे ४४१२ गुन्हे दाखल झाले. गेल्या तीन वर्षांतल्या अशा गुन्हेगारीचा सरासरी दर २० टक्क्यांनी वाढला आहे. संपत्तीच्या वादातून राज्यात ज्येष्ठांवर झालेल्या अत्याचाराच्या एकूण घटनांपैकी ५१८ घटना मुंबईत तर २३१ घटना एकट्या नागपुत घडल्या. ९ ज्येष्ठांवर जीवघेणे हल्ले झाले. यातील ५ घटनांची नोंद नागपुरात तर मुंबईत २ घटनांची नोंद झाली. किरकोळ मारहाण झालेल्या ४६३ ज्येष्ठांना जखमी करण्यात आले. नागपुरात ९ ज्येष्ठांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती करण्यात आल्या.

चोरी, दरोड्यातही नागपूर आघाडीवर

आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर जीवनाची सायंकाळ तरी सुखा-समाधानात घालवावी यासाठी ज्येष्ठांनी कमावलेली मिळकत चोरीला गेल्याच्या १०४५ घटना राज्यात घडल्या. यातही नागपूर आघाडीवर आहे. नागपुरात एकटे राहणाऱ्या २९ ज्येष्ठांच्या घरातून रोख आणि दागिने लंपास करण्यात आले. दरोड्याच्या सर्वाधिक २४ घटनांची नोंद एकट्या नागपुरात घेतली गेली. संघटित गुन्हेगारी करीत आठ ज्येष्ठांची मालमत्ता गुंडांनी बळकावली.

मालमत्ताही धोक्यात

शारीरिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत कुटुंबातील सदस्य अथवा ओळखीतल्या व्यक्तींकडून राज्यात १२५१ ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता अथवा रोख रक्कम बळकावण्यात आली. मुंबईत २०६, तर नागपुरातील ५३ ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्ता बळकावल्या गेल्या. २७९ ज्येष्ठ नागरिक फसवणुकीचे बळी ठरले. यात उपराजधानीतले ४५ आणि मुंबईतील १३१ ज्येष्ठांचा समावेश आहे.