नागपूर: जम्मू- काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी काही दिवसांपूर्वी हल्ला करून अनेक नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर भारत- पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दोन देशात युद्ध होण्याचीही शक्यता नकारता येत नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना स्वसंरक्षणासाठी युद्ध सरावाचे आदेश सोमवारी दिले. त्यापार्श्वभूमीवर युद्धादरम्यान रात्री ब्लॅकआऊट करून संपूर्ण काळोख केला जातो. परंतु अद्यापही महावितरणला सूचना नसल्याने ब्लॅकआऊटबाबत सूचना देणार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

दोन देशातील युद्धादरम्यान शत्रूंना शहरातील स्थळे दिसू नये म्हणून वीज खंडित करून काळोख केला जातो. त्याअंतर्गत संपूर्ण शहर व गावाची वीज ब्लॅकआऊट केली जाते. परंतु ही वीज संपूर्ण ग्रीडबंद करून अथवा निश्चित शहरातील वीज यंत्रणेद्वारे बंद करण्याची सोय आहे. दरम्यान संपूर्ण ग्रीड बंद केल्यास पून्हा सूरू करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक उडू शकते. परंतु अद्यापही महावितरण अथवा महापारेषणच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत शासनाकडून काहीही सूचना आली नाही.

त्यामुळे दोन्ही विभागातील अधिकारी नाव न टाकण्याच्या अटीवर हा सराव दिवसा राहण्याची शक्यता बघता ब्लॅकआऊटची गरज भासण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त करत आहे. रात्री ब्लॅकआऊट केल्यास ग्रीडची समस्या उद्भवल्यास नवीन पेच उभा राहण्याचाही धोका अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

देशभऱ्यातील २४४ जिल्ह्यातील अग्निशमन, नागरी संरक्षण विभाग दक्ष

भारत- पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली स्वरक्षण सिध्दांत सर्वोच्च पातळीवर ठेवण्याच्या हेतूने देशभरातील २४४ जिल्ह्यातील अग्निशमन, नागरी संरक्षण, गृह रक्षक दलाला सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे २४४ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापनासह अन्य जिल्हास्तरीय प्राधिकरणे, गृह रक्षक दल, एनसीसी, एन एस एस. यांना युध्दसरावात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात अद्यापही याबाबत आदेश नाही, हे विशेष.

देशात प्रथमच युद्ध सराव

भारत आणि पाकिस्तान मधील तणावाची स्थिती लक्षात घेता १९७७ नंरच्या युध्दानंतर प्रथम भारताने युध्द सरावाचा निर्णय घेतला आहे. नागपूर देशाच्या मध्यस्थानी नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असणारे शहर असून येथून देशाच्या चारही बाजूंनी दळणवळण सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे संवेदनशील शहराच्या यादीत नागपूचा समावेश होतो. तुर्तास सराव असलेल्या शहरात नागपूरचा समावेश नसला तरी शहराचे महत्व बघता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि युद्ध सज्जतेसाठी मॉक ड्रिलचे आयोजन होण्याची शक्यता नकारता येत नाही.