नागपूर : पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांच्या घरावर दगड मारणारेच आता भाजपमध्ये आले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी झालेल्या डॉ. रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारक सुनील आंबेकर यांच्यासह स्व. डॉ. रामदास आंबटकर यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, पूर्वी भाजप व संघाला अनुकूल वातावरण नव्हते. त्यामुळे संघाचे कार्यालय व माझ्या घरावर अनेक जण शिवीगाळ करत दगड मारून रेशीमबागकडे पळून जायचे.
आता परिस्थिती बदलली. तेच दगड मारणारे भाजपमध्ये आले. पूर्वी अनुकूल नसलेल्या स्थितीत झटणाऱ्या डॉ. रामदास आंबटकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच भाजपला आज चांगले दिवस आले. हे आम्ही विसरायला नको. समाजासाठी कार्य करणे हे एक व्रत आहे, असे रामदासजी मानायचे. त्याच भावनेतून त्यांनी संघटनेचे कार्य केले. त्यांचे कार्य, त्यांचा त्याग युवा कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहे, असेही गडकरी म्हणाले.
आंबटकर परिवाराने तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. संपूर्ण परिवाराची विचारांशी बांधिलकी होती. रामदासजींनी विद्यार्थी परिषद आणि पुढे भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अतिशय निष्ठेने काम केले. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला मदत करण्यासाठी सगळे पुढे आले. अटीतटीच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
गित हृदयाला भिडणारे – चंद्रकांत पाटील
अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून भाजपपर्यंत लोक जोडण्यात डॉ. आंबटकर यांची भूमिका महत्वाची होती. त्यांचे नियोजन अचूक होते. ते चांगले गितकार होते. त्यांचे गित थेट हृदयाला भिडत होते, अशी भावना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
जीव ओतून काम – आंबेकर
जीव ओतून संघटनेत काम कसे करावे हे डॉ. रामदास आंबटकर यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. त्यांच्या कुटुंबात पूर्वीपासून संघाचे संस्कार राहिले आहे. हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत गेल्याचे दिसते, असे मत रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारक सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.