अमरावती : मी महाराष्ट्रात जन्माला आली, याचा मला अभिमान आहे. मराठी मातृभाषा नसूनही मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करते. मी मराठी भाषा शिकली. त्यावेळी लोक मला हसायचे. पण मी मराठी बोलण्याचे प्रयत्न कधीच सोडले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मला हा अभिमान राहील. ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता, ती भाषा प्रथम क्रमांकावरच राहील. पण, दुसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून हिंदीचा आम्ही सन्मान करणारच. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय पोळी शेकण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख उपस्थित होते.
नवनीत राणा म्हणाल्या, मराठी आणि हिंदी भाषेत अंतर निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करीत आहेत. या दोघांची मुले इंग्रजी शाळेत शिकले, की मराठी शाळेत शिकले, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी या दोन्ही नेत्यांना विचारला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून काही नेत्यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते कुठल्याही विषयावर टीका करताना दिसतात. महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत आहे. अनेक शहरांमध्ये मेट्रो रेल्वेसेवा सुरू झाली आहे.
आगामी काळात अमरावतीतही मेट्रो सुरू होणार आहे. पण, काही नेते मराठी आणि हिंदी भाषेचा वाद निर्माण करून महापालिकेच्या निवडणुकीआधी राजकीय लाभ मिळवू पाहत आहेत. माझ्यासाठी हिंदुस्थान हा माझा धर्म आहे. राजकीय फायद्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडू नका, असा आपला या नेत्यांना सल्ला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीतून जे चित्र अमरावती जिल्ह्यात दिसले, भूतो न भविष्यती असा विजय मिळाला.
अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत देखील या दोन्ही पक्षांची युती होईल. आपण सर्व जण एकत्र लढू आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकवू. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या निवडणुकीत आम्हाला यशाची खात्री आहे.