लोकसत्ता टीम
अमरावती : शहरात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे रेल्वे स्थानक चौक परिसरातील मुख्य प्रचार कार्यालय जमीनदोस्त झाले आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग उडून गेले. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. विजेच्या तारा जमिनीवर लोंबकळत होत्या. शहरातील बस स्थानकाकडून रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्गावर झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. शहरातील इतरही अनेक मार्गांवर झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडे हटवून मार्ग मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
आणखी वाचा-बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
बस स्थानकांकडून इर्विन चौकात जाणाऱ्या मार्गावर विजेच्या तारा व झाडे कोसळली. खापर्डे बगीचा परिसरात दोन्ही बाजूने झाडे पडली शाळेच्या भिंतीवर देखील झाड कोसळल्याने, शाळेकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद झाल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून सुमारे ५३ हजार ४०२ हेक्टरमधील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे. सर्वाधिक नुकसान चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात झाले आहे.