अकोला : दक्षिण-उत्तर भारताला जोडणारी आणखी एक नवीन रेल्वेगाडी धावणार आहे.सोबतच पुण्यासाठी देखील आणखी एक नवीन रिवा-पुणे नियमित साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या दोन गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेने कोईम्बतोर-जयपूर-कोईम्बतोर दरम्यान विशेष गाडीच्या १० फेऱ्या धावणार आहेत.

गाडी क्रमांक ०६१८१ कोईम्बतोर-जयपूर विशेष गाडी कोईम्बतोर येथून ७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी सकाळी ०२.३० वाजता सुटेल. ही गाडी इरोड, रेणीगुंठा, कर्नुल, काचीगुडा, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, सुरत, वडोदरा, अजमेर मार्गे जयपूर येथे शनिवारी दुपारी १३.२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर-कोईम्बतोर विशेष गाडी जयपूर येथून १० ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान दर रविवारी रात्री २२.०५ वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच कोईम्बतोर येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे.

या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलीत, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून १८ डब्बे असतील.अकोला मार्गे पुण्यासाठी आणखी एक नवीन गाडी सुरू होणार आहे. ही गाडी सुरू करण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती. गाडी क्र. २०१५१ पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल.

अकोला येथे दर शुक्रवारी ००.४५ वाजता आगमन व ००.४८ वाजता प्रस्थान करेल. गाडी क्र. २०१५२ रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. अकोला येथे दर बुधवारी रात्री २२.३७ वाजता आगमन व २२.४० वाजता प्रस्थान करेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना येथे थांबा राहील. या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, तीन इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन राहणार आहे. या नवीन दोन गाड्यांमुळे प्रवाशांना गर्दीच्या काळात सुविधा होईल.