वर्धा : जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांच्या पत्नीला आर्वी मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्याचा  रोष आता हळूहळू प्रकट होवू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार)  हिंगणघाट व आर्वी या दोन जागा आघाडीत मिळाल्या. त्यात आर्वी येथून लढण्यास अनेक ईच्छुक होते. पण पक्षाने खासदार काळे यांच्या पत्नी  मयुरा काळे यांना संधी दिली. यावर पक्षातून घराणेशाहीचा आरोप झाला. त्यावर  त्यांनी, ‘मग एकनाथ शिंदेचे काय,’? असा सवाल केला. तसेच माझ्या पत्नीने पक्षाकडे साधा अर्ज पण केला नव्हता.

पक्षानेच आदेश दिला म्हणून ती उभी असल्याचे ते जाहीर बोलले.मात्र त्यांचे हे मत  पक्षनेते  फेटाळून लावत पत्नी साठीच तिकीट आणतांना काळे यांनी हा मतदारसंघ घरातच राहावा यासाठी हा डाव मांडल्याचा आरोप आता होत आहे. याबाबत पहिली जाहीर तोफ  राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) स्टार प्रचारक व खदखद  मास्तर म्हणून परिचित नितेश कराळे यांनी डागली. हिंगणघाट येथील शरद पवार यांच्या सभेत भाषण झाल्यानंतर ते बीड व अन्य जिल्ह्यात प्रचारसभा करण्यासाठी रवाना झाले. पवार यांच्यासोबत सहा सभा असल्याचे ते बीड येथून बोलतांना म्हणाले. खासदार काळे यांच्यावर रोष व्यक्त करणाऱ्या व्हिडीओचे त्यांनी समर्थन केले. जे खरं आहे ते खरंच राहणार.

हेही वाचा >>> भाजपच ओबीसींच्या पाठीशी! , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं मोठी व्हावी असे या प्रस्थापित नेत्यांना वाटत नाही. कुटुंबासाठीच यांचं राजकारण चालते. मी कोणाला भीत नाही. मोदींवर  खुलेआम टीका करतो, तर हे कोण लागले, असेही कराळे बेधडक बोलतात. या व्हिडीओतून त्यांनी खासदार काळे यांनी कसा अन्याय केला त्याचा पाढा वाचला आहे. त्यांना पक्षाशी काहीच घेणेदेने नाही. पक्षाचा पराभव झाला  तरी चालेल. पुढल्या वेळी खासदार राहलो नाही तर आर्वी विधानसभा आहेच, असे यांचे धोरण असल्याची टीका ते यात करतात. गाडीवर अद्याप काँग्रेस पक्षाचाच झेंडा आहे. ते राष्ट्रवादीत आले तेव्हापासून त्यांनी अन्य एकालाही पक्षात आणले नाही, असे कराळे यांची ‘खदखद ‘आहे.  साधा अर्ज दाखल करण्यास पण त्यांनी बोलावले नाही. सभेस बोलावले नाही. म्हणून मी पण गेलो नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांना लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसने नेमले आहे.