नागपूर : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अपेक्षेप्रमाणे वादळी ठरले आहे. मात्र, या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चर्चेत आले आहेत. गडकरी यांच्या संसद भवनातील कार्यालयाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यातून बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसून आले आहे.
यात केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, खासदार कंगना रणौत, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार असल्याने या बैठकांचे अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत. त्यामुळे या बैठकींमागील गुढ काय? असा प्रश्न समोर येत आहे.
नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या विशेष शैलीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे सर्वपक्षिय नेत्यांशी जवळचे संबंध आहे. त्यामुळे अनेक पक्षातील नेते त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी गडकरींची भेट घेत असतात. समाज माध्यमांवर गडकरींचे व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमध्ये सर्वच पक्षातील नेते त्यांच्या कार्यालयात भेटायला आल्याचे दिसते. तर जे.पी. नड्डा हे रोज गडकरी यांच्यासोबत बैठका घेत असल्याचे दिसून येते. तर समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही गडकरींना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी निवेदन दिले आहे. काही अधिकारी गडकरींना नकाशा समजावून सांगत असल्याचे चित्र आहे. गडकरींना भेटणाऱ्यांमध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. यातून अनेक राजकीय अंदाज वर्तवले जात असले तरी ह्या बैठका केवळ विविध कामांसदर्भात असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांची टीका
संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहेत. ऑपरेशन सिंदूर’प्रमाणे बिहारमधील ‘एसआयआर’ मोहिमेवरही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा झाला पाहिजे, ही मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. या मागणीसाठी बुधवारी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या आवारात मकरद्वारासमोर निदर्शने केली. दोन्ही सभागृहांमध्ये स्थगन प्रस्ताव व नियम २६७ अंतर्गत चर्चेसाठी विरोधकांनी नोटिसा दिल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार नसल्याने या नोटिसा सलग तिसऱ्या दिवशीही फेटाळण्यात आल्या.
बिहारच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर पुन्हा शरसंधान साधले. निवडणुकीत घोटाळ्याचा मुद्दा फक्त बिहारपुरता सीमित नाही. “काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेला घोटाळा रंगेहात पकडला. आम्ही आयोगाकडे मतदारयाद्या मागितल्या, त्या दिल्या नाहीत. मतदानाचे चित्रिकरण दाखवा अशी मागणी केली तर, कायदाच बदलून टाकला. कर्नाटकमध्येही आम्ही मोठी चोरी पकडलेली आहे. तिथे लोकसभा निवडणुकीत घोटाळा कसा केला गेला, हे आम्ही प्रत्यक्षात दाखवू. भारतात निवडणुकीत घोटाळे हातात हे वास्तव आहे,” अशी टीका राहुल यांनी केली.